
E-Rationcard : ऑनलाइन ई-शिधापत्रिका मिळणार आता निःशुल्क
सातारा - शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर सध्याच्या कार्यपद्धतीनुसार तपासणी होऊन योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई-शिधापत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही शिधापत्रिका संबंधित लाभार्थी पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. यामध्ये अन्न सुरक्षा योजना, राज्य योजनेचे शिधापत्रिकधारक यांचा समावेश आहे.
शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना क्यूआर कोड आधारित ई-शिधापत्रिका ऑनलाइन तसेच डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. यामध्ये शिधापत्रिकांवर कोणत्या योजनेत समावेश होतो, याची नोंद केली जाता आहे.
अंत्योदय अन्न शिधापत्रिका (एएवाय), प्राधान्य कुटुंब योजना (पीएचएच), राज्य योजनेंतर्गत (एपीएल फारमर), राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने व्यतिरिक्त (एनपीएच) असे नमूद करण्यात येत आहे. त्यामध्ये ई-शिधापत्रिका सुविधेसाठी सेवानिहाय शुल्क आकारण्याचा निर्णय शासनाने घेतला होता; पण राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व राज्य योजनेचे शिधापत्रिकाधारक हे गरीब व गरजू कुटुंबातील असतात. त्यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या व राज्य योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना या ऑनलाइन सुविधेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, असे शासनाच्या विचाराधीन होते.
त्यानुसार अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजना, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल शेतकरी अशा सर्व शिधापत्रिकाधारकांना ऑनलाइन सेवेद्वारे ई-शिधापत्रिका मोफत मिळणार आहे. अर्जदाराने ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांची तपासणी होऊन योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई-शिधापत्रिका उपलब्ध होणार आहे. ही शिधापत्रिका संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे.
संकेतस्थळावरून करा डाऊनलोड..
पुरवठा विभागाची याबाबत नुकतीच बैठक झाली आहे. त्यात याची तातडीने अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ई-शिधापत्रिका आता निःशुल्कपणे पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील.