ऑक्‍सिजन बेड तयार; पण डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांची वानवा!

Satara
Satara

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन विविध ठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये ऑक्‍सिजन बेडचाही समावेश केला आहे. मात्र, तेथे दाखल होणाऱ्या रुग्णांना सेवा देण्यासाठी डॉक्‍टर, कर्मचारीच उपलब्ध नसल्याने आता ऐन कोरोनात हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. काही ठिकाणी खासगी डॉक्‍टरांच्या भरवशावर कोरोना केअर सेंटर सुरू केली आहेत. मात्र, संबंधित डॉक्‍टर बांधिल नसल्याने ते पूर्णवेळ सेवा देऊ शकत नाहीत. परिणामी, जिल्ह्यातील सेंटरमध्ये बेड तयार असूनही रुग्णांना सेवा देण्यासाठी डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांवर आता इलाज करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

कोरोना रुग्णांची जिल्ह्यात संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. गावोगावी रुग्ण आढळू लागल्याने लोकांची चिंता वाढत आहे. त्यातच प्रशासनाकडून "ऍन्टीजेन्स टेस्ट'ही वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील कोरोना चाचणी सेंटरअंतर्गत कालअखेर 59 हजार 521 रुग्णांचे घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यातील 27 हजार 361 रुग्णांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. त्यातील आठ हजार 589 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 17 हजार 101 रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत 752 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीवरून जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती वाढली असल्याचे दिसून येत आहे.

वाढलेली संख्या विचारात घेऊन जिल्ह्यातील साखर कारखान्यांपैकी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने 150 बेडचे कोरोना सेंटर सुरू केले आहे. तेथे 50 ऑक्‍सिजनचे व उर्वरित 100 साधे बेड आहेत. त्याचबरोबर कऱ्हाडच्या यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय हॉलमध्ये 50 बेड, वारणा हॉटेलमध्ये 50 बेड, साताऱ्यातील राधिका हॉटेलमध्ये 60 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच साताऱ्यात पुष्कर मंगल कार्यालयात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वखर्चातून 80 बेडचे कोरोना हॉस्पिटल सुरू केले असून, त्यामध्ये 40 बेड ऑक्‍सिजन व साधे 40 बेडचा समावेश आहे. त्याचबरोबर कोरेगाव येथील पाटील हॉस्पिटल, पोलिसांचे कोरोना सेंटर यांसह अन्य तालुक्‍यांतही कोरोना सेंटर सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये ऑक्‍सिजन बेडचाही समावेश करण्यात आला आहे. 

मात्र, त्यातील बहुतांश सेंटरला डॉक्‍टर आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता भासत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सेंटरमध्ये बेड तयार असूनही रुग्णांना सेवा देण्यासाठी डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांची वानवा अशी स्थिती झाली आहे. कोरेगाव येथे आमदार महेश शिंदे यांनीही वैयक्तिरित्या कोविड रुग्णालय सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये 100 बेड ऑक्‍सिजनयुक्त असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, काही सेंटर खासगी डॉक्‍टरांच्या भरवशावर सुरू करण्यात आली आहेत. मात्र, संबंधित डॉक्‍टर बांधिल नसल्याने ते किती काळ चालेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे संबंधित सेंटर सध्यातरी रामभरोसेच आहेत. 

भरतीनंतर स्टाफची उपलब्धता? 

जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेमार्फत डॉक्‍टर, कर्मचारी यांची नव्याने भरती करण्यात येणार आहे. त्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच संबंधित सेंटरला डॉक्‍टर आणि कर्मचारी उपलब्ध होतील, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. 

रुग्णालय कनेक्‍टचा तात्पुरता पर्याय 

जेथे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे, ते सेंटर तात्पुरता पर्याय म्हणून तेथील उपजिल्हा रुग्णालय, कॉटेज हॉस्पिटलला जोडण्यात आली आहेत. त्या सेंटरवर संबंधित रुग्णालयाचे नियंत्रण राहत आहे. मात्र, संबंधित रुग्णालयावरच कामाचा मोठा ताण असल्याने त्यांना डोके वर काढायला वेळ मिळत नाही. त्यातच आणखी हा नवीन कार्यभार देण्यात आल्याने त्यांच्यावर अधिकच भार पडला आहे, त्याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com