सातारा : ठाण्यात गेल्यावर पोलिस तुमच्याशी वागतात कसे ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

सातारा : ठाण्यात गेल्यावर पोलिस तुमच्याशी वागतात कसे ?

सातारा : पोलिस ठाण्यात योग्य वर्तणूक मिळत नाही, या समाजात दृढ असलेल्या संकल्पनेला छेद देण्यासाठी पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी एक ऑगस्टपासून कोणत्याही कामासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या नागरिकांकडून मोबाईवरून ऑनलाइन पद्धतीने अभिप्राय (फिडबॅक फॉर्म) घेतला जाईल. त्यात कमी मूल्यांकन (रेटिंग) मिळणाऱ्या पोलिस ठाण्यांच्या वर्तनात थेट अधीक्षकांकडून सुधारणा घडवून आणली जाणार आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात गेलेल्या नागरिकाला सन्मानाने वागणूक मिळून पोलिस दलाचे ‘सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद अधिक बळकट होण्यास मदत मिळणार आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्त्‍वाची जबाबदारी पोलिस दल पार पाडत असते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना विविध कारणांसाठी पोलिस ठाण्यात जावे लागते. त्यामध्ये गुन्हा दाखल करणे, तक्रार अर्ज देणे, सण-समारंभाची परवानगी काढणे, पासपोर्ट, चारित्र्य पडताळणीचा दाखला, एखादी गोष्ट चोरीला गेल्यास अशा विविध कारणांचा त्यात समावेश असतो. या वेळी पोलिसांचे नागरिकांशी असलेले वर्तन योग्य नसते, अशा तक्रारी अनेकदा समोर येतात. त्यामुळेच की काय? पोलिस ठाण्याची पायरी चढू नये,

अशी म्हण प्रचलित झाली असेल. आजवर अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी विविध मार्गांनी पोलिस व नागरिकांतील सलोखा राखला जावा, यासाठी मोहल्ला कमिटी, पोलिस मित्र अशा विविध उपक्रमांतून प्रयत्न केले. परंतु, आपण पोलिस ठाण्यात गेल्यावर आपल्याला कशी वागणूक मिळाली. चांगली असेल तर चांगली किंवा चुकीची मिळाल्यास चुकीची याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याला कल्पना देण्याबाबतचा मार्ग प्रत्येक नागरिकाला उपलब्ध नव्हता. त्यामुळे आपल्या आधिपत्याखालील पोलिस ठाण्यांत नेमके काय चालले आहे, आपल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी होते का? हे पोलिस अधीक्षकांनाही समजण्याचा मार्ग उपलब्ध नव्हता.

पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी मात्र आधुनिक तंत्रज्ञाची साथ घेत नागरिकांना आपले म्हणणे थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचविण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकाला चांगली वागणूक मिळेल,

नागरिकांच्या पुढाकाराची गरज

पोलिस ठाण्यांत चांगली वागणूक मिळत नसल्याची अनेकांची तक्रार असते. परंतु, त्यावर काय करायचे? याचा पर्याय प्रत्येकालाच माहीत असतो असे नाही. परंतु, अजय कुमार बन्सल यांच्या उपक्रमामुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाने मोबाईलवर आलेल्या मेसेजच्या माध्यमातून फिडबॅक फॉर्म भरलाच पाहिजे. आपल्याला येत नसेल तर, घरातील किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून फॉर्म भरला गेला पाहिजे. त्यामुळे जिल्हा पोलिस दलाच्या नागरिकांशी असणाऱ्या वर्तनात सुधारणा करणे पोलिस अधीक्षकांना शक्य होईल.

तुम्हाला काय वाटते?

प्रत्येक व्यक्तीने आपले काम हे साधना समजून केले पाहिजे. आपल्याला कर्माने मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करू नये, असे भगवद्‌गीता सांगते. पोलिस व्यवस्थेत अधिकारांचा योग्य वापर होत नाही, अशी सर्वसामान्य लोकांची नेहमीच तक्रार असते. अधिकारीपदावरील व्यक्तींनी आपल्या अधिकारांचे पालन करताना आपल्यात अहंकार निर्माण होणार नाही, यासाठी दक्षता घ्यायला हवी, असे आपल्याला वाटते का? पोलिस अधीक्षकांच्या या उपक्रमाबाबत आपली प्रतिक्रिया ९६०४५८५७९२ या व्हॉट्सॲपवर कळवा.

नागरिकांचे काम लगेच होईल का, हे सांगता येत नाही. प्रत्येक कामाला कालमर्यादा किंवा तांत्रिक मर्यादा असू शकतात. परंतु, समस्या घेऊन आलेल्यासोबत पोलिसांचे वर्तन कसे असते, हे महत्त्‍वाचे असते. काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून पोलिस व्यवस्‍थित वागत नाहीत, तक्रार घेत नाहीत, असे फोन येत होते. नवीन योजनेमुळे कोणत्या पोलिस ठाण्यात कशी वागणूक दिली जाते, हे कागदावर येईल. त्यामुळे त्यात बदल करणे सोईचे जाईल. नागरिकांशी योग्य व्यवहार ही प्रत्येक पोलिसाची प्राथमिकता राहिली पाहिजे, यासाठीच हा उपक्रम आहे.

-अजय कुमार बन्सल, पोलिस अधीक्षक

Web Title: Satara Police Treat You Online Activity

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..