Gram Panchayat Election : माण तालुक्यात महाविकास आघाडी भाजपचे पानिपत करणार?

केराप्पा काळेल
Thursday, 14 January 2021

कुकुडवाड गटातील ग्रामपंचायतींमधील राजकीय कुरघोड्याचे राजकारण पाहता सत्ता कायम राखण्याचे आव्हान सत्ताधारी गटांसमोर आहे.

कुकुडवाड (जि. सातारा) : कुकुडवाड गटात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना सुरू आहे. कुकुडवाड, वळई, पानवन, जांभुळणी, वडजल, ढाकणी या गावांमध्ये दुरंगी लढती होत आहेत. 

कुकुडवाड ग्रामपंचायतीमध्ये पाच वॉर्डमधून 13 सदस्य निवडून दिले जाणार आहेत. त्यापैकी वॉर्ड चार आणि तीनमधून महाविकास आघाडीचे प्रत्येकी एक असे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 11 जागांसाठी 22 उमेदवार मैदानात आहेत. त्याचबरोबर पानवन येथे चार वॉर्डमधून 11 जागांसाठी आमदार गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना सुरू आहे. वळईमध्ये नऊ जागांसाठी आमदार गटाविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. ढाकणी येथेही नऊ जागांसाठी दोन्ही गटांत समोरासमोर लढती होत आहेत. वडजल येथे सात जागांसाठी 15 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. दोन्ही पॅनेलसोबतच एक अपक्ष आपले नशीब आजमावत आहे. 

चितळीत निवडणूक एकतर्फी की घासून?; गुदगे-येळगावकर गटात कॉंटे की टक्कर

वळई हे आमदार जयकुमार गोरे यांच्या विचारांचे ओळखले जाते. स्थानिक पदाधिकाऱ्यांपेक्षा लोकप्रतिनिधींना मानणारा गट याठिकाणी असून, सामान्यांच्या सुख-दुःखात सहभाग घेणाऱ्या आमदार गोरेंच्या एकमुठी मतांचा गठ्ठा असलेल्या याच गावात विधानसभा निवडणुकीत आमदार गोरे यांना तालुक्‍यात सर्वाधिक मतदान झाले होते. मात्र, आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदारांनी गावातील युवकांना वाऱ्यावर सोडून पारंपरिक नेत्यांना जवळ केल्याने नाराज तरुणांनी वेगळी चूल मांडली आहे. हे तरुण महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार गटाचे पानिपत करणार का? असा सवाल मतदारांमधून व्यक्त केला जात आहे. आमदार गटातील पाच वर्षांतील अंतर्गत धुसफूस आणि कुरघोड्यांच्या राजकारणाला वैतागलेल्या मतदारांनी पदाधिकाऱ्यांच्या एकछत्री कार्यक्रमाला वैतागून दुसरी वाट चोखाळली आहे. त्याचा फटका यंदाच्या निवडणुकीत बसण्याची शक्‍यता आहे. 

Gram Panchayat Election : खंडाळा तालुक्‍यात महिलाराज; तब्बल 84 महिलांची बिनविरोध निवड

स्वयंघोषित नेत्यांचा निघतोय घाम 
कुकुडवाड गटातील ग्रामपंचायतींमधील राजकीय परिस्थिती आणि कुरघोड्याचे राजकारण पाहता सत्ता कायम राखण्याचे आव्हान सत्ताधारी गटांसमोर आहे. मात्र, कुकुडवाड गटातील जनता सुज्ञ असून, स्वतःची मागील सर्व पापे लपवून दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन, दुसऱ्यांच्या चुलीत कणसे भाजणाऱ्या स्वयंघोषित पुढाऱ्यांची लोकप्रतिनिधींची वाहवा मिळवण्यासाठी सुरू असलेली धडपड जनतेने चांगलीच ओळखली आहे. त्यामुळे स्वयंघोषित नेत्यांचा चांगलाच घाम निघत आहे. परिणामी गरीब जनतेचे मातृत्व स्वीकारून, नेतृत्व फुलवून कर्तृत्वाला गती देणाऱ्या सदस्यांच्याच पाठीशी राहणार असल्याचे ठाम मत येथील जनता व्यक्त करीत आहे.

पिंगळीत स्थानिक नेतृत्वाचा लागणार कस; नऊ जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात  
 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Politics News BJP Challenge In Front Of Mahavikas Aghadi In Kukudwad Gram Panchayat