चोपडी, मुळगावात गृहराज्यमंत्री सत्ता अबाधित राखणार?; राष्ट्रवादीलाही सत्तांतराची संधी
चोपडी व मुळगाव ग्रामपंचायतीवर देसाई गटाची गेली अनेक वर्षे सत्ता आहे. मात्र, देसाई गटांर्गत वर्चस्ववादाचे ग्रहण पाहावयास मिळते. त्रिपुडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. चोपडी ग्रामपंचायतीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची सत्ता आहे.
पाटण (जि. सातारा) : चोपडी, मुळगाव व त्रिपुडी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत देसाई-पाटणकर असा चुरशीचा सामना रंगतदार होणार आहे. कवरवाडी ग्रामपंचायतीची बिनविरोधची दिंडी लक्ष वेधून घेत आहे. मात्र, चोपडी व मुळगावात देसाई गटांर्गत मतभेदाचा अचूक फायदा राष्ट्रवादीने उचलला तर सत्तांतर घडू शकते. मुळगावात सोशल मीडियाचा धुमाकूळ चालला असल्याने अटीतटीची लढत लक्ष्यवेधी ठरणार आहे.
चोपडी व मुळगाव ग्रामपंचायतीवर देसाई गटाची गेली अनेक वर्षे सत्ता आहे. मात्र, देसाई गटांर्गत वर्चस्ववादाचे ग्रहण पाहावयास मिळते. त्रिपुडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. चोपडी ग्रामपंचायतीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची सत्ता आहे. दहा वर्षे चर्चेत असणारे माजी सरपंच दत्ता जाधव या निवडणुकीत सक्रिय नाहीत. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचे राम आर्डे, शिवाजी जाधव देसाई गटाला टक्कर देत असले तरी मुरलेल्या नाथा जाधवांशी कसा लढा देतात, यावर राष्ट्रवादीचे गणित अवलंबून आहे. नाथा व दत्ता जाधवांच्या गटांतर्गत वर्चस्ववादाचे मनोमिलनात रुपांतर झाले तर देसाईंची सत्ता अबाधित राहू शकते. मात्र, दत्ता जाधवांची गुपचिळी गटाला तारक ठरणार, की राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करण्यास मदत करते, याकडे लक्ष लागले आहे.
Gram Panchayat Election : पुस्तकांच्या गावात राष्ट्रवादीसमोर भाजप-सेनेचे तगडे आव्हान
मुळगाव ही गृहराज्यमंत्र्यांची हक्काची गढी. पाटण शहरालगत हाकेच्या अंतरावर असली तरी पाटणकरांना शिरकाव करता आलेला नाही. या गावातही गटांतर्गत वाद विकोपाला गेला आहे. देसाईंची पारंपरिक हक्काची माणसे विरोधी छावणीत दाखल झाली आहेत. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची तयारी वर्ष झाले चर्चेत आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर होत असल्याने फेसबुक, ट्विटर व व्हॉट्सऍपवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दोन्ही गटांनी विजयी होण्यासाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत विरोधी पॅनेलचे नेतृत्व जगन्नाथ सुपुगडे व शिवाजी मोळावडे करत असून, त्यांचा सामना सत्ताधारी देसाई गटाच्या पॅनेलचे नेतृत्व उत्तम मोळावडे करीत आहेत.
..अखेरच्या क्षणी राजवडीत एका जागेसाठी निवडणूक; सर्वानुमते सहा जागा बिनविरोध
त्रिपुडीत पारंपरिक लढाई सुरू
त्रिपुडीत पारंपरिक लढाई सुरू आहे. माजी सरपंच राहुल पाटील व लाला पैलवान यांच्या नेतृत्वाखाली देसाईंचे तर माजी सरपंच धनाजी देसाई, विठ्ठल जाधव व सखाराम पवार यांच्या नेतृत्वाखाली पाटणकरांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पॅनेल अशी दुरंगी लढत लक्ष्यवेधी ठरणार आहे. सत्ता अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादी तर सत्तांतरासाठी देसाई गट कामाला लागला आहे. टोकाच्या राजकारणाची भूमिका न घेता गुपचूप प्रचार सुरू आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे