esakal | Don't Worry : यमदूताने गाठण्यापूर्वी तुम्हाला मिळेल मदत

बोलून बातमी शोधा

Don't Worry : यमदूताने गाठण्यापूर्वी तुम्हाला मिळेल मदत

यावेळी महामार्ग पोलिस केंद्राच्या वतीने ऍम्बुलन्स व दवाखान्यांचे संपर्क क्रमांक असलेल्या पत्रकांचे वाटप करण्यात आले.

Don't Worry : यमदूताने गाठण्यापूर्वी तुम्हाला मिळेल मदत
sakal_logo
By
राजेंद्र ननावरे

मलकापूर (जि. सातारा) : राज्य महामार्गावर अपघातातील जखमींना तत्काळ मदत व्हावी, यासाठी महामार्ग पोलिस "हायवे मृत्युंजय दूत' हे नावीन्यपूर्ण अभियान राबवणार आहेत. या अभियानांतर्गत महामार्गावर मृत्युंजय दूत कार्यरत राहून जखमींना तातडीची मदत होईल, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक अस्मिता पाटील यांनी दिली.
 
येथील आनंदराव चव्हाण विद्यालयात "हायवे मृत्युंजय दूत' अभियानाचा प्रारंभ झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, पोलिस उपनिरीक्षक अशोक जाधव, कृष्णा हॉस्पिटलचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. विजयसिंह पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी व हायवे पोलिस मित्र उपस्थित होते. पाटील म्हणाल्या, ""राष्ट्रीय व राज्य महामार्गावर झालेल्या अपघातातील जखमींना तत्काळ मदत मिळावी व जीवितहानी कमी व्हावी, यासाठी "हायवे मृत्युंजय दूत' ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
महामार्ग पोलिस केंद्राकडून राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील मॉल, पेट्रोल पंप, ढाबा, हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच महामार्गालगतच्या गावांतील पाच लोकांचा ग्रुप तयार करण्यात येणार आहे. त्यांना "हायवे मृत्युंजय दूत' असे संबोधण्यात येणार असून त्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे. या दूतांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात येणार असून अपघातग्रस्त व्यक्तीस कसे हाताळावे, प्राथमिक उपचार कसे करावेत, याचे प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रत्येक ग्रुपला स्टेचर्ससह प्राथमिक उपचारांचे सर्व साहित्य देण्यात येईल.

महामार्ग पोलिस विभागातर्फे त्यांना नजीकचे दवाखाने व ऍम्ब्युलन्स तसेच महत्त्वाच्या कार्यालयांचे दूरध्वनी क्रमांक देण्यात येणार आहे. अपघातग्रस्त व्यक्तींना ऍम्ब्युलन्सद्वारे कमी वेळेत रुग्णालयात पाठवून जीवितहानी टाळण्याबाबत प्रशिक्षित करण्यात येणार आहे.'' या वेळी (कै.) बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची माहितीही त्यांनी दिली. अपघातग्रस्तांना द्यावयाच्या प्राथमिक उपचाराचे प्रात्यक्षिक दाखविले. श्री. थोरात यांचेही भाषण झाले. अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या दस्तगीर आगा यांचा सत्कार करण्यात आला. महामार्ग पोलिस केंद्राच्या वतीने ऍम्बुलन्स व दवाखान्यांचे संपर्क क्रमांक असलेल्या पत्रकांचे वाटप करण्यात आले.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसह सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

काय सांगता! चक्क विहिरी पेट्रोल- डिझेलने भरल्या; शेतकरी चिंतेत

210 रुपयांना खरेदी केलेली लस सामान्यांना 250 रुपयांना दिली जात आहे : पृथ्वीराज चव्हाणांचा आराेप

मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही हेच पालिकेत आहे सुरु

रत्नागिरीत आता ‘हायवे मृत्युंजय दूत’ उपक्रम; वाढत्या अपघातांच्या मदतीसाठी नवी मोहीम

Edited By : Siddharth Latkar