पुसेगाव-मांजरवाडी रस्ता पावसाळ्यात बंद?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाने परराज्यातून, परजिल्ह्यातून आलेले मजूर गावी परतले आहेत. त्यामुळे लॉकडाउनमध्ये विकासकामे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली तरीही मजूराअंभावी ही कामे ठप्प आहेत. त्यातही काही कामे अपूर्ण अवस्थेत दिसतात. पुसेगाव-मांजरवाडी रस्त्याचे काम बंद असल्याने पावसाळ्यात या रस्त्यावरील वाहतूक बंद होण्याचा धोका आहे. 

बुध (जि. सातारा) ः कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सर्वच विकासकामांना खिळ बसली आहे. खटाव तालुक्‍यातील पुसेगाव ते मांजरवाडी दरम्यानचे रस्ता रुंदीकरणाचे कामही त्यामुळे ठप्प आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी उखडून ठेवलेला रस्ता पावसाळा तोंडावर आला, तरी त्याच स्थितीत आहे. या मार्गावरील पुलांच्या कामासह रस्त्याची अन्य कामे युद्धपातळीवर न झाल्यास पावसाळ्यात उत्तर खटाव परिसरातील चाळीसहून अधिक वाड्यावस्त्यांचा जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटण्याची भीती व्यक्त होत आहे. 

रस्त्याच्या साइडपट्ट्या भरण्यासह रस्त्यावरील छोट्या पुलांच्या बांधकामास सुमारे आठ महिन्यांपूर्वी सुरुवात झाली. साइडपट्या भरण्याचे काम पूर्ण झाले. मात्र, रस्त्यावरील छोट्या पुलांची कामे जागोजागी सुरू असतानाच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाउन सुरू झाले आणि रस्ता रुंदीकरणाच्या कामाला ब्रेक लागला. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण होतील या फाजील आत्मविश्‍वासावर छोट्या पुलांची कामे करताना ठेकेदारांनी ओढ्या-नाल्यांवर नळ्या न टाकताच केवळ मातीचे भराव टाकून वाहतुकीस पर्यायी रस्ता करून दिला आहे. 

अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. या मार्गावर ठिकठिकाणी पुलासाठी फक्त खड्डे खोदले असून, ही कामे अद्यापही ठप्प आहेत. त्यामुळे ही कामे आता कितीही वेगाने केली, तरी पावसाळ्यापूर्वी पुलांची कामे पूर्ण होणे केवळ अशक्‍य असल्याचे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे. पावसाळ्यात ओढ्या, नाल्याला पूर येताच पर्यायी रस्त्यासाठी टाकलेले मातीचे भराव वाहून जाऊन हा मार्ग दळणवळणासाठी बंद होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. मॉन्सूनपूर्व एखादा मोठा पाऊस झाला तरी या रस्त्यावरील वाहतुकीला ब्रेक लागणार आहे. त्याचे गांभीर्य ठेकेदारासह प्रशासनलाही दिसत नाही. 

 

गृहिणींसाठी महत्वपुर्ण बातमी; साडे चार लाख ग्राहकांना लाभ कंपनीचा दावा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Pusegaon-Manjarwadi road closed in monsoon?