
सातारा : निधी खर्चात रामराजे आघाडीवर
सातारा : जिल्ह्यातील दहा आमदारांना उपलब्ध झालेल्या आमदार निधीतून आतापर्यंत विविध विकासकामांवर ३६ कोटी ९३ लाख रुपये खर्च झाले आहेत. जिल्ह्यात ५१ कोटींची ६२० कामे मंजूर करण्यात आली होती. उर्वरित १४ कोटींचा निधी या वर्षातच उपलब्ध होणार असल्याने आगामी काळात तो मंजूर कामांवर खर्च केला जाणार आहे. आतापर्यंत विकासकामांवर ७० टक्केच निधी खर्च झाल्याचे चित्र आहे. निधी खर्चात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आघाडीवर आहेत. तर कमी प्रमाणात निधी खर्च करणारांत आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे.
जिल्हा नियोजन समितीकडे आमदारांचा विकास निधी उपलब्ध होतो. जिल्ह्यात दहा आमदार असून, प्रत्येकी चार कोटींप्रमाणे ४० कोटी रुपये निधी जिल्ह्याला मिळतो. २०२०-२१ मध्ये आमदार निधीतील अखर्चित राहिलेला १०.९९ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने यावर्षी उपलब्ध केला आहे. त्यामुळे आमदार निधीसाठी ५०.९९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यावर्षी सर्व आमदारांची मिळून ६२० विविध कामे मंजूर झाली होती. त्यावर आतापर्यंत ३६ कोटी ९३ लाख ६३ हजार रुपये खर्च झाला आहे. त्यात ज्या आमदारांचा निधी बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या विकासकामांसाठी दिला जातो, त्यातील बांधकामचा निधी मार्च अखेरपर्यंतच खर्च करावा लागतो. तर जिल्हा परिषदेला दिलेला निधी पुढील वर्षीही खर्च करता येतो. त्यामुळे हा निधी खर्च झाल्याचे दिसत नाही. निधी खर्चात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आघाडीवर असून त्यांचा सर्व निधी खर्च झाला आहे. त्यापाठोपाठ आमदार दीपक चव्हाण,जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आमदार शशिकांत शिंदे यांचा सर्वांत कमी प्रमाणात निधी खर्च झाला आहे.
खर्च झालेला निधी असा...
सभापती रामराजे नाईक-निंबाळकर पाच कोटी दोन लाख ९६ हजार
पालकमंत्री बाळासाहेब पाटील तीन कोटी ८५ लाख ६५ हजार
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई तीन कोटी २१ लाख ३४ हजार
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एक कोटी ८७ लाख ९५ हजार
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले चार कोटी २१ लाख ८७ हजार
आमदार मकरंद पाटील तीन कोटी ८६ लाख १० हजार
आमदार महेश शिंदे तीन कोटी २१ लाख ७९ हजार
आमदार दीपक चव्हाण चार कोटी ८७ लाख ८९ हजार
आमदार जयकुमार गोरे चार कोटी ३४ लाख २४ हजार
आमदार शशिकांत शिंदे दोन कोटी ४३ लाख ८४ हजार
Web Title: Satara Ramraje Leads Fund Expenditure
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..