
Satara: रामराजे नाईक-निंबाळकर;दुष्काळी भागाच्या शेती पाण्याचा प्रश्न सोडवणार
पिंपोडे बुद्रुक- जावळी खोऱ्यातील सोळशी खोऱ्यात धरणाची निर्मिती झाली, तर पुराचे वाहून जाणारे पाणी अडवून उर्वरित दुष्काळी भागाच्या शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघू शकतो.
त्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.
येथे ग्रामपंचायतीच्या वतीने रामराजे नाईक- निंबाळकर यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, आमदार दीपक चव्हाण, रामभाऊ लेंभे, सरपंच डॉ. दीपिका लेंभे,
उपसरपंच रणजित लेंभे, बाळासाहेब सोळस्कर, मंगेश धुमाळ, पोपटराव निकम, चंद्रकांत निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. राजकीय कारकिर्दीचा सर्वाधिक काळ मी शेतीचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी घालवलेला आहे.
उर्वरित दुष्काळी भागातील शेतीचा पाणीप्रश्न मार्गी लावल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही, असे स्पष्ट करून रामराजे म्हणाले, ‘‘कृष्णा आणि कोयनेच्या पुराचे पाणीच आपल्यासाठी आवश्यक आहे. ते अडवल्याने कोणाचेही नुकसान होणार नाही.
मात्र, दुष्काळी भाग आणि शेती समृद्ध होईल. हे लक्षात घेऊनच धोम-बलकवडी धरण बांधावे लागले. जावळी खोऱ्यातील सोळशी हे धरणही त्याचसाठी प्रस्तावित असून,
त्याद्वारे उर्वरित दुष्काळी भागाच्या शेतीपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघू शकतो. मात्र, त्यासाठी राजकारणात काम करणारी लोके ही ध्येयवादी असावी लागतात.’’
या वेळी आमदार चव्हाण, रामभाऊ लेंभे, बाळासाहेब सोळस्कर, अमोल निकम यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी गुणवंत विद्यार्थी व खेळाडू, तसेच परिसरातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्यांसह सूर्यकांत निकम, किसन लेंभे, संजीव साळुंखे, मोहन साळुंखे, भरत साळुंखे, जगन्नाथ साळुंखे, हणमंत पवार, विजय लेंभे, नागेश जाधव, अजित भोईटे, बाळासाहेब भोईटे, गुलाब जगताप,
मेघराज भोईटे, राहुल भोईटे, सचिन पोळ, दत्तात्रय भोईटे, राधिका धुमाळ, दिलीप निकम, मनोज लेंभे, संभाजी निकम, स्वप्नील वाघांबरे यांच्यासह पंचक्रोशीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सागर लेंभे यांनी प्रास्ताविक केले. नरेंद्र वाघांबरे यांनी आभार मानले.