"या' तालुक्‍यात पावसाची उघडीप; शेतकऱ्यांपुढे चिंतेचे ढग

राजेंद्र शिंदे | Thursday, 30 July 2020

पूर्वमोसमी व "निसर्ग' चक्रीवादळात झालेल्या पावसाने खटाव तालुक्‍यात यंदा खरीप हंगामातील पेरण्या वेळेत झाल्या. त्यानंतरही पावसाने साथ दिल्याने पिके जोमात आली आहेत. मात्र, सध्या पावसाने उघडीप दिल्याने संपूर्ण खरीप हंगामाच धोक्‍यात आला आहे. 

खटाव (जि. सातारा) ः पावसाच्या उघडिपीने खटाव परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. पेरण्या झाल्यानंतर काही दिवसांतच पावसाने दडी मारल्याने संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याच्या शक्‍यता निर्माण झाली आहे. 

जूनच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने येथील शेतकऱ्यांनी घेवड्यासह सोयाबीन, वाटाणा, बटाटा आदी पिकांची पेरणी करण्यात आली. पिके उगवून आल्यानंतरही पावसाची रिमझिम थोड्या का प्रमाणात होईना सुरू होती. मात्र, जवळपास सर्वच पिके फुलधारणा होण्याच्या अवस्थेत असतानाच पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या मनात मोठे चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. तालुक्‍यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याने येथील शेतकरी नगदी पिकांचे उत्पादन घेऊ लागले आहेत. तथापि बदलत्या हवामानामुळे या पिकांवर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. आले, बटाटासारख्या भांडवली पिकांवर रोग पडू लागला आहे. कडक उन्हामुळे आले पिवळे पडू लागले आहे, तर बटाट्यावर करपा रोगाचे प्रमाण दिसू लागले आहे. 

जून, जुलै महिने पावसाचे समजले जातात. मात्र, जुलैमध्ये वळिवाच्या पावसासारखा विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडत असल्याने नक्की मॉन्सूनचा पाऊस आहे का वळिवाचा असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे. गेल्या आठवड्यापासून कडक ऊन पडू लागले आहे. दिवसभर उकाडा वाढत आहे. अशा हवामानात आले, बटाट्यासारख्या भांडवली पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव लगेच दिसून येतो. कडक हवामान राहिले, तर आल्याचे पीक लागायला सुरुवात होते. त्यामुळे पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत निसर्गाने साथ दिली नाही तर यावर्षी उदरनिर्वाह कसा होणार याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. यावर्षी सर्वच पिके ऐन जोमात आहेत; परंतु पावसाअभावी शेतकरी हतबल होऊन ढगांकडे पाहून पावसाची वाट पाहात आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

SSC Result : सातारा जिल्ह्यातील 38 हजार 688 विद्यार्थीं यशस्वी ; तुमच्या तालुक्याचा निकाल पाहा