
Satara : पाकळणी महापूजेने सेवागिरी यात्रेची सांगता
पुसेगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या अमृतमहोत्सवी यात्रेची सांगता रविवारी (ता. १) पाकळणी महापूजेने झाली. या वेळी मंदिरात महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. यंदाची यात्रा ट्रस्टने धार्मिक, आध्यात्मिक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करून मोठ्या उत्साहात पार पाडली.
विशेष बाब म्हणजे ही यात्रा भाविक, व्यावसायिक आणि यात्रेकरू यांच्या मते अलौकिक आणि नावीन्यपूर्ण ठरली. यावर्षीची भाविकांची विक्रमी गर्दी आणि सेवागिरींच्या चरणी भरभरून आलेलं दान गौरवशाली ठरले.
यात्रेच्या यशस्वितेसाठी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, सचिव अविनाश देशमुख, व्यवस्थापक विशाल माने, कर्मचारी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेत यात्रा निर्विघ्न पार पडली. सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांतील वस्तू, गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी युवती व महिलांनी दुकानांवर चांगलीच गर्दी केली होती.
खेळण्याच्या दुकानात आपल्या मुलांचे हट्ट पुरवताना आई-बाबांची गर्दी दिसत होती. थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी नेपाळ्यांनी थाटलेल्या उबदार कपड्यांच्या दुकानात यात्रेकरूंची गर्दी वाखाणण्याजोगी होती. पुसेगाव यात्रेतील खाऊगल्ली आणि मिठाईची दुकाने म्हणजे खाद्य पंढरीचं. सुप्रसिद्ध जिलेबी, फरसाणसह विविध चटकदार पदार्थांची खाऊ गल्ली यात्रेकरूंचे आकर्षण ठरली.
जिलेबीच्या दुकानात बसून यात्रेकरू गरमागरम जिलेबी व खमंगदार फरसाणा खाण्याचा आनंद लुटताना दिसत होते. यात्रा सुरळीत पार पाडण्यात प्रशासकीय विभागांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. मात्र, स्थानिक पोलिस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे यात्रेकरू आणि ट्रस्टला त्रासाला सामोरे जावे लागल्याची खंत चेअरमन बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केली.
सलग सतरा दिवस यात्रा
दर वर्षी सेवागिरी यात्रेचा कालावधी हा अकरा दिवसांचा असतो; परंतु यंदा कोरोना निर्बंधांनंतर दोन वर्षांनी यात्रा भरल्याने आणि नाताळाच्या सुट्यांचा योग जुळून आल्याने यंदाची यात्रा सलग १७ दिवस गर्दीत आणि मोठ्या उत्साहात पार पडली. सेवागिरींच्या चरणी ऐतिहासिक दान अमृतमहोत्सवी सोहळ्यापासून यात्रा प्रदर्शनाचा कालावधी संपेपर्यंत भाविकांनी सेवागिरींच्या चरणी जवळपास दीड कोटीची देणगी अर्पण केली असून, या देणगीत आणखी भर पडत आहे