esakal | ती निराश झाली नाही... बनवल्या चक्क 400 गणेशमूर्ती
sakal

बोलून बातमी शोधा

patan

कोपर्डे हवेलीतील शुभांगी पाटील ही आर्टिस्ट. लॉकडाउनमध्ये तिने बनवलेल्या वस्तूंना मागणी कमी झाली. या स्थितीत निराश न होता तिने गणेशमूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला. तनिष्कांसह महाविद्यालयीन युवतींनी केलेल्या मदतीतून तिने तब्बल 400 गणेशमूर्ती बनवल्या आहेत. 

ती निराश झाली नाही... बनवल्या चक्क 400 गणेशमूर्ती

sakal_logo
By
जयंत पाटील

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : काम करण्याची धमक आणि मनाची तयारी असेल तर कोणतेही काम अवघड नाही, हे कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील शुभांगी पाटील या युवतीने सिद्ध करून दाखविले. लॉकडाउनच्या काळात दोन महिन्यांत तिने चारशेहून अधिक गणेशमूर्ती व 110 गौराई तयार करण्याची किमया केली आहे. 

शुभांगी पाटील ही आर्टिस्ट आहे. मोल्ड तयार करणे, लग्नाचे मोठे सेट तयार करणे, नक्षीकाम करणे, फायबरमध्ये मूर्तिकाम करणे, पेंटिंग आदी कामात तिचा हातखंडा आहे. मुंबई, पुणेसह पंढरपूरमधून मोल्ड, सेट, स्टॅचू आणि विविध प्रकारच्या फायबर मूर्तींसाठी तिच्याकडे मोठी मागणी असते; परंतु कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाउन सुरू झाला. त्यामुळे तिच्या मालाची मागणी थांबली. परिणामी शुभांगीच्या हातात असलेल्या ऑर्डरदेखील रद्द झाल्या. या परिस्थितीत निराश न होता तिने गणपती उत्सव डोळ्यासमोर ठेऊन मोठ्या जिद्दीने गणेशमूर्ती बनविण्यास सुरुवात केली. नेहमीपेक्षा वेगळे काम करताना तिला असंख्य अडचणींचा सामना करावा लागला, तरीही त्या अडचणीतून मार्ग काढत तिने चारशेहून अधिक गणेशमूर्तीसह 110 गौराई बनविल्या आहेत. हे काम करत असताना वेळोवेळी तनिष्का व्यासपीठाकडून मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाल्याचे ती सांगते. 

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय बंद आहेत. मग दुपारच्या वेळेत शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थिनी शुभांगीला कामात मदत केली. मूर्ती पेंटिंगसह इतर लहान कामात त्यांची शुभांगीला खूप मदत होत आहे. त्यामुळे मुलींना वेगळी कला आत्मसात करण्याची संधीदेखील मिळत आहे व मूर्ती बनविण्याच्या कामाला गतीही मिळाली आहे. दहा इंचापासून ते दोन फुटांपर्यंत गणपतीच्या सुबक मूर्ती बनवून त्यावर अतिशय सुबक नक्षीकाम केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत एका मुलीने धाडसाने मूर्ती बनविल्यामुळे शुभांगीचे सगळीकडे कौतुक होत आहे. 

लॉकडाउनमुळे सगळ्याच वस्तूंचे दर थोड्या फार प्रमाणत वाढलेत परिणामी मूर्ती बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि कलरच्या किमतीत वाढ झाली असली, तरी शुभांगीने गणेशमूर्तीच्या किमती वाढवलेल्या नाहीत. मूर्तींची सुबकता आणि दर्जेदार नक्षीकामामुळे मूर्तींना चांगली मागणी आहे. 


लॉकडाउनमध्ये सगळे व्यवसाय ठप्प असताना गणेशमूर्ती बनविण्याचा निर्णय घेतला. या कामात महाविद्यालयातील विद्यार्थिनींची मदत झाली. तनिष्का व्यासपीठाकडून वेळोवेळी मार्गदर्शन झाले. 

- शुभांगी पाटील, तनिष्का, कोपर्डे हवेली 

(संपादन ः संजय साळुंखे) 

पोलिसांचा तुम्हाला काही त्रास? गृहराज्यमंत्र्यांचा साताऱ्यात सवाल 

loading image
go to top