माणमधील सहा तलाव ओसंडून वाहू लागले

Satara
Satara

गोंदवले (जि. सातारा) : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे माणमधील सहा तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. या मुसळधार पावसाने तालुक्‍यातील दहा तलावांत मिळून 30.12 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला असून, येत्या काही दिवसांत 100 टक्के पाणीसाठा होण्याची चिन्हे दिसत आहेत. माण नदीसह राणंद, ढाकणी, लोधवडे, गंगोती, महाबळेश्वरवाडी, मासाळवाडी हे तलाव सध्या पूर्णक्षमतेने भरून वाहू लागले आहेत. 

तालुक्‍यात सलग तीन वर्षांत पावसाने हुलकावणी दिल्यामुळे गेल्या वर्षीपर्यंत तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. तालुक्‍यातील सर्वच पाणीसाठे कोरडे पडल्याने लोकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. अनेक महिने पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर आणि जनावरांसाठी छावणीचा आधार घ्यावा लागला. ही परिस्थिती बदलण्यासाठी लोकांना केवळ पावसाचीच आतुरता होती. परंतु, गेल्यावर्षी परतीच्या पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने हा दुष्काळ मिटला होता. गेल्यावर्षी झालेल्या पावसाचा पाणीसाठा हा काही तलावांत शिल्लक असतानाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या पावसाने तालुक्‍यातील सर्वत्र पाणीसाठा होण्यास चांगली मदत झाली आहे.

महाबळेश्वरवाडी तलावात पावसापूर्वीच टेंभू पाणी योजनेतून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे निम्मा तलाव भरत आलेला असतानाच आता पावसामुळे तो पूर्णक्षमतेने भरून वाहू लागला आहे. तालुक्‍यातील सर्वाधिक पाणीसाठा होणाऱ्या आंधळी तलावात आज सकाळपर्यंत 6.93 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. या तलावात येणाऱ्या पाण्याचा स्रोत सुरूच असल्याने लवकरच पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागेल. आजअखेर ब्रिटिशकालीन पिंगळी तलावात 7.12 दशलक्ष घनमीटर, जाशी तलावात 2.76 दशलक्ष घनमीटर, तर जांभुळणी तलावात 2.42 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. हे तलावदेखील अल्पावधीतच भरून वाहण्याची चिन्हे आहेत. 

सध्याच्या मुसळधार पावसाने माण नदीदेखील उगमापासून राजेवाडी तलावापर्यंत वाहती झाली आहे. ब्रिटिशकालीन राणंद तलावासह लोधवडे, गंगोती, महाबळेश्वरवाडी, मासाळवाडी व ढाकणी हे तलाव गेल्या काही दिवसांपासून पूर्णक्षमतेने भरून वाहत आहेत. या दहा तलावांची एकूण पाणीसाठवण क्षमता 35.35 दशलक्ष घनमीटर असून, आज सकाळपर्यंत 30.12 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला होता. तालुक्‍यात अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने सर्वच तलाव क्षेत्रात पाण्याचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच उर्वरित 1.34 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होऊन सर्वच पाणीसाठे हाउसफुल्ल होण्याची चिन्हे दिसत आहेत. 


पाणीसाठ्यांची सद्य:स्थिती 

तलावाचे नाव, पाणीसाठा क्षमता, सद्य:पाणीसाठा (सर्व साठे दशलक्ष घनमीटरमध्ये) राणंद 7.12-7.12, पिंगळी 2.38-1.18, आंधळी 9.28-6.93, लोधवडे 0.99-0.99, जांभुळणी 2.42-1.87, गंगोती 1.79-1.79, 
महाबळेश्वरवाडी 2.01-2.01, ढाकणी 3.05-3.05, मासाळवाडी 2.42-2.42, जाशी 2.93-2.76. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com