माणदेशात घबराट...एकाचवेळी सहा मुंबईकर चालक, वाहक कोरोनाबाधित

Satara
Satara

दहिवडी (जि. सातारा) : माण तालुक्‍यातील सहा गावांत एकाच दिवशी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून, सामान्य जनता मात्र घाबरली आहे. पॉझिटिव्ह आलेले हे सर्व जण मुंबई, ठाणे याठिकाणी चालक, वाहक म्हणून सेवेत असल्याची माहिती समोर आली आहे. 

वावरहिरे, दानवलेवाडी व मोही येथील तिघे ठाणे आगारात चालक असून, ते 30 जून रोजी ठाणे येथून एका खासगी गाडीने गावी आले होते. आल्यानंतर तिघांनाही गावातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना दोन जुलै रोजी दहिवडी कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी वावरहिरे, दानवलेवाडी येथील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले, तर मोही येथील एकाचा अहवाल निगेटिव्ह आला. पळशी येथील बाधित युवक मुंबईत बेस्ट चालक असून, तो अतीत (ता. सातारा) येथील युवकासमवेत दुचाकीवरून गावी आला होता. मात्र, दुचाकीवर आलेला त्याचा सहकारी कोरोना बाधित निघाल्याने पळशी येथील युवकास दहिवडी येथील कोरोना कक्षात ठेवण्यात आले होते. शनिवारी रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पळशीकरांचीही चिंता वाढली.

मोगराळे येथील बाधित रुग्ण मुंबईत परेल आगारात चालक असून, तो मुंबईवरून एका दुधाच्या टॅंकरमध्ये बसून थेट दहिवडी येथील कोरोना सेंटरमध्ये दाखल झाला होता. शनिवारी रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्याचा मोगराळे गावाशी संपर्क आला नसल्याने पुढील धोका टळला आहे. म्हसवडनजीकच्या मानेवाडी येथील व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने म्हसवडकर धास्तावलेले आहेत. संबंधित बाधित ठाणे आगारात वाहक म्हणून सेवेत असून, ठाणे भागात रुग्णांची संख्या वाढल्याने एक जुलै रोजी मानेवाडी तेथे आला होता. त्यानंतर त्रास होऊ लागल्याने तो स्वतः दोन जुलैला म्हसवड येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखला झाला होता. शनिवारी रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने म्हसवडकरांची चिंता अधिकच वाढली आहे.

इंजबाव येथील बाधित युवक मुंबईत खासगी प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करत असून, तो लॉकडाउननंतर लगेचच गावी आला होता; परंतु काही दिवसांपूर्वी तो पुन्हा मुंबईत गेला होता. त्यानंतर 29 जून रोजी स्वतःच्या खासगी वाहनातून गावी आलेला होता. मुंबईहून आल्यानंतर त्रास जाणवू लागल्याने त्या युवकास म्हसवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने इंजबाव गाव सील करण्यात आले. शनिवारी पॉझिटिव्ह आढळून आलेले सहाही रुग्ण मुंबईहून प्रवास करून आले असून, त्यापैकी चौघे एसटी चालक, एक जण एसटी वाहक, तर एक जण खासगी चालक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सर्व बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांना विलगीकारण कक्षात हलविण्यात आले आहे. 

""सध्याची चिंताजनक परिस्थिती पाहता ग्रामस्थांनी स्वतःहून अतिशय काळजीपूर्वक वागण्याची गरज आहे. छोटासा हलगर्जीपणा आपल्या सर्वांसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे सर्वांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.'' 
- बी. एस. माने, तहसीलदार, माण 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com