esakal | व्याजवाडीच्या स्नेहलचा आयर्लंडमध्ये झेंडा, कोरोना लस संशोधनासाठी निवड
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

स्नेहल महेंद्र पिसाळ हे या युवतीचे नाव. व्याजवाडीसारख्या ग्रामीण पार्श्वभूमी लाभलेल्या गावातून ती पुढे आली आहे. स्नेहल मध्यमवर्गीय कुटुंबातील. बालपणापासून अत्यंत हुशार, कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेली. स्नेहलने आपल्या प्राथमिक शिक्षणाचे धडे साताऱ्यात गिरविले.

व्याजवाडीच्या स्नेहलचा आयर्लंडमध्ये झेंडा, कोरोना लस संशोधनासाठी निवड

sakal_logo
By
सुनील शेडगे

सातारा (जि. सातारा) : जिल्ह्याचा नावलौकिक उंचावताना वाई तालुक्‍यातील व्याजवाडी येथील एका युवतीची आयर्लंड देशात कोरोना लस संशोधनासाठी निवड झाली आहे. तिची ही अभिमानास्पद कामगिरी जिल्ह्यातील युवा वर्गासाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. 

स्नेहल महेंद्र पिसाळ हे या युवतीचे नाव. व्याजवाडीसारख्या ग्रामीण पार्श्वभूमी लाभलेल्या गावातून ती पुढे आली आहे. स्नेहल मध्यमवर्गीय कुटुंबातील. बालपणापासून अत्यंत हुशार, कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेली. स्नेहलने आपल्या प्राथमिक शिक्षणाचे धडे साताऱ्यात गिरविले. ती सातारा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी. शिक्षणाबरोबरच तिने खेळातही विशेष प्रावीण्य संपादन केले. त्यातून टेबल टेनिसमधील एक उत्कृष्ट खेळाडू अशीही तिची ओळख बनली. वक्तृत्व हादेखील तिच्या आवडीचा प्रांत. विविध राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांत ती सातत्याने सहभागी झाली. तिथेही तिने भरीव यश संपादन केले आहे.

दहावीच्या परीक्षेत तिला 96 टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण सायन्स इन्स्टिट्यूटमधून इयत्ता बारावीचे शिक्षण पूर्ण केले. उल्लेखनीय म्हणजे बारावीच्या परीक्षेतदेखील तिला 80 टक्के गुण मिळाले. पुढे कोल्हापूरच्या केआयटी कॉलेजमध्ये ती शिकली. तिथे अभ्यासाच्या बळावर तिने आपली चुणूक दाखविली. अगदी एकही दिवस सुटी न घेता तिने आपले शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यातून तिने पदवीचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. आयर्लंड देशातील आंतरराष्ट्रीय मानांकन लाभलेल्या औषध कंपनीत स्नेहल सध्या कार्यरत आहे. या कंपनीतही तिने आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे. तिथे कोरोना या विषाणूजन्य आजारावर सुरू असलेल्या लसनिर्मितीत तिचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. 

वडील महेंद्र पिसाळ अन्‌ आई सौ. सुषमा यांची प्रेरणा आपल्यासाठी आत्यंतिक महत्त्वपूर्ण असल्याची स्नेहल सांगते. भाऊ ओंकार याच्या सहकार्याचाही ती उल्लेख करते. आपल्या यशात आजवरच्या सर्व शिक्षकांचा, तसेच मार्गदर्शकांचा वाटा हादेखील मोलाचा असल्याचे ती आवर्जून स्पष्ट करते. 


कामावरची निष्ठा महत्त्वाची 

जीवनातील कोणतेही क्षेत्र असो, त्यात नेमून दिलेल्या कामावरची निष्ठा ही अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्नेहल सांगते. "अपार मेहनत, कष्ट करण्याची तयारी, आत्मविश्वास, परिस्थितीची जाणीव, परमेश्वर अन्‌ आई-वडिलांचे आशीर्वाद यामुळेच हे यश दृष्टिपथात आले' या शब्दांत स्नेहलने आपल्या यशाचा प्रवास उलगडला. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 
 

loading image
go to top