Satara : हाफ तिकिटामुळे एसटीला फायदाच ; आठवडाभरात साडेतीन लाख महिलांचा प्रवास; Satara ST benefits half ticket lakh women travel in a week; | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

women in ST Bus ticket fares

Satara : हाफ तिकिटामुळे एसटीला फायदाच ; आठवडाभरात साडेतीन लाख महिलांचा प्रवास

कऱ्हाड : एसटी महामंडळाच्या सर्व बसमधून महिलांना प्रवासात ५० टक्के तिकीट सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे एसटीची प्रवासी संख्या वाढण्यास मदत झाल्याचे दिसून येते. या सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम राज्य सरकार महामंडळाला देणार असल्याने एसटीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

या योजनाला महिलांचा प्रतिसाद मिळत असून, केवळ सातच दिवसांत जिल्ह्यातील तीन लाख ६० हजार ७०५ महिलांना त्याचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या लालपरीला ही योजना संजीवनी देणारी ठरणार आहे.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद असलेल्या एसटी महामंडळाला ऊर्जितावस्था देण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. कोरोना काळात एसटीची सेवा दोन वर्ष बंद राहिली. त्यामुळे एसटीची चाके जागेवरच थांबल्याने महामंडळाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. त्यातून पर्याय काढण्यासाठी मध्यंतरी महामंडळाने सरकारची परवानगी घेऊन एसटीतर्फे मालवाहतूक सुरू केली.

त्यातून महामंडळाला आर्थिक मदत झाली. सध्या एसटीतर्फे समाजातील विविध ३० घटकांना प्रवास भाड्यात ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास सुविधा सुरू केली. या योजनेचा लाभ आतापर्यंत सुमारे सहा कोटी ज्येष्ठ प्रवाशांनी घेतला आहे. सध्या दररोज सरासरी पाच लाखांपेक्षा अधिक अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक एसटीच्या विविध बसमधून मोफत प्रवास करतात.

यामुळे एसटी महामंडळाला महिन्याला ६५ ते ७५ कोटी रुपयांची प्रतिपूर्ती रक्कम राज्य सरकारकडून मिळते. सध्या एसटीतून दररोज ५० ते ५५ लाख लोक प्रवास करतात. त्यातून महामंडळाला दिवसाला प्रतिपूर्ती रकमेसह २२ ते २४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यापैकी सुमारे ३० टक्के महिला प्रवासी आहेत.

म्हणजे सुमारे १७ लाख महिला प्रवासी आहेत. यात १२ वर्षांखालील मुलींना आणि ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ महिलांना प्रवासी भाड्यात ५० टक्के, तर ७५ वर्षांपुढील महिलांना १०० टक्के सवलत दिली जाते. नव्या योजनेमुळे सुमारे १७ लाख महिला प्रवाशांपैकी दररोज सुमारे १३ लाख महिला प्रवाशांना ५० टक्के तिकीट सवलतीचा फायदा होत आहे.

दरम्यान, जिल्ह्यात केवळ सातच दिवसांत तब्बल तीन लाख ६० हजार ७०५ महिलांनी एसटी प्रवास करून या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीसाठी ही योजना संजीवनीच ठरली आहे.

खासगी वाहनांपेक्षा एसटीला पसंती...

महिलांना एसटी तिकिटामध्ये दिलेल्या सवलतीमुळे यापूर्वी खासगी वाहनांकडे असलेला महिला प्रवासी आता एसटीकडे वळल्या आहेत. त्यामुळे खासगी वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून येते. महिलांचा प्रवास एसटीने वाढल्याने त्यांच्या कुटुंबातील लोकही वाट पाहीन; पण एसटीनेच जाईन या भूमिकेत आले आहेत.

टॅग्स :SatarawomenSTbus Driver