Satara : जात वैधता प्रमाणपत्रासाठी वर्षाची मुभा Satara State Co-operative Election Authority to candidates of Market Committees | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

caste Certificate

Satara : जात वैधता प्रमाणपत्रासाठी वर्षाची मुभा

कऱ्हाड : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीची सध्या धामधूम सुरू आहे. जिल्ह्यात नऊ कृषी उत्पन्न बाजार समितींच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यास अवघे दोनच दिवस बाकी आहेत. अशातच आता राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. त्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक वर्षांची मुदत देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, पाटण, वाई, कोरेगाव, लोणंद, फलटण, वडूज आणि मेढा या बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीत इतर प्रवर्गातील उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करताना विविध प्रकारचे दाखले सादर करावे लागतात. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना इतर प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना जात प्रमाणपत्र सादर करावे लागते.

या निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे; परंतु अनेक उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने त्यांना निवडणूक लढविण्यापासून वंचित राहण्याची वेळ येते. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्याचा विचार करून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने यावेळच्या बाजार समितीच्या निवडणुकीत राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १२ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

संबंधित उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र सादर करण्यास शासनाने मुभा दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना त्याचा चांगला फायदा होणार असून, दिलासाही मिळाला आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

- संदीप जाधव, उपनिबंधक, सहकारी संस्था कऱ्हाड