
Satara : संपाचा फटका विद्यार्थ्यांना; सलग दुसऱ्या दिवशी शासकीय कार्यालये ओस
सातारा : सलग दुसऱ्या दिवशी शासकीय कर्मचारी संपावर असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय विभागातील कामकाज ठप्प झाले आहे. या संपाचा भार प्रत्येक विभागाचे खातेप्रमुख व त्यांच्यासमवेत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आला आहे. दरम्यान, या संपाचा फटका नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही बसला असून, शिक्षक संपात सहभागी असल्याने जिल्ह्यात एकूण ७३२ शाळा बंद आहेत.
राष्ट्रीय पेन्शन स्कीम (एनपीएस) रद्द करून जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करावी, या मुख्य मागणीसाठी सर्वच शासकीय कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपामुळे नेहमीच नागरिकांचा गजबज असलेले जिल्हाधिकारी, झेडपी, पंचायत समितीसह सर्वच कार्यालयांमध्ये बुधवारीही शुकशुकाट दिसून आला.
सलग दुसऱ्या दिवशी जुनी पेन्शन योजना लागू करा, या आशयाच्या टोप्या घालून जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता, तसेच जिल्हा परिषदेच्या आवारातही विविध संघटनेचे पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी ठाण मांडून बसले होते.
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, कृषी विभाग, वन विभागासह सर्वच शासकीय विभागातील सुमारे ३० हजारांहून अधिक कर्मचारी संपात सहभागी आहेत. दरम्यान, नगरपालिका हद्दीतील आपत्कालीन यंत्रणा सुरू असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दाखले देण्याचे कामकाजही सुरू आहे.
दरम्यान, जिल्ह्यात ८५ आरोग्य केंद्र असून, ४१५ उपकेंद्रे आहेत. यामधील सुमारे एक हजार कर्मचारी संपात सहभागी असल्याने केवळ वैद्यकीय अधिकारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जिवावर आरोग्य केंद्रे सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांचा दुवा असणारा आरोग्य विभागाची यंत्रणा कोलमडल्याचे चित्र दिसून आले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा निर्णय लवकरात-लवकर न झाल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.