
Satara : चुकीची माहिती भरणाऱ्या शिक्षकांवर कारवाई
सातारा : प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया यंदा ऑनलाइन सुरू आहे. मात्र, बदलीसाठी ऑनलाइन माहिती भरताना जिल्ह्यातील १८ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याचे आढळून आल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे अपील दाखल करण्यात आले आहे. या अपिलांची सुनावणी जिल्हा परिषदेत सुरू आहे. किरकोळ चुका सुधारून अपिले निकाली काढण्यात येणार आहेत. माहिती अपलोड करताना जाणीवपूर्वक चुकीची माहिती भरणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रकिया सध्या सुरू झाली आहे. संवर्ग एक व संवर्ग दोनमधील एक हजार ७६३ शिक्षकांनी ऑनलाइन अर्ज केले होते. अर्ज पडताळणीत एक हजार ४७ शिक्षक पात्र ठरले आहेत. ही बदली प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. अर्ज पडताळणी करण्यात आली आहे. बदली प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी शासनाने एका अॅपची निर्मितीही केली होती. सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे आणि एका शाळेत पाच वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. नव्या प्रक्रियेनुसार बदलीपात्र शिक्षकांना ५० शाळांचा पसंतीक्रम देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सुगम आणि दुर्गम शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यापूर्वीच घोषित केली होती. दरम्यान, बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या २५ नोव्हेंबरला सादर झाल्याने त्यानंतर काही तक्रार असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांकडे अपील करण्यास मुदत होती. यादरम्यान १८ बदल्यांबाबत अपील शिक्षण विभागाकडे दाखल करण्यात आले आहे. संबंधित तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, संबंधित शिक्षक यांच्यासमोर जिल्हा परिषदेत या अपिलांवर सुनावणीची प्रक्रिया सुरू होती.
...ही माहिती भरताना चुका
ऑनलाइन माहिती भरताना जन्म, नाव बदल, नेमणूक तारखेत बदल, नियमित वेतनश्रेणी बदल, प्रोफाईल चुका याबाबत अपील दाखल आहेत. या प्रक्रियेत शिक्षकांनी भरलेल्या माहितीत किती पारदर्शकता आहे? हेसुध्दा सर्वांना पाहता येत असल्याने ही माहिती तपासून अपिले दाखल झाली आहेत. शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने गंभीर चुका आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.