सातारा तहसील कार्यालयात विनापावती वसुली; नागरिकांची लूट

प्रशांत घाडगे | Thursday, 29 October 2020

तहसील कार्यालयात रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व इतर विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या ठिकाणी कोणताही दाखला काढण्यासाठी सुरवातीला अर्ज घेऊन कोणत्या प्रकारचा दाखला काढवयाचा आहे, त्याची सविस्तर माहिती भरून त्यासोबत इतर कागदपत्रे जोडावयाची असतात.

सातारा : शैक्षणिक व इतर कामांसाठी विविध प्रकारचे दाखले तहसीलदार कार्यालयात मिळतात. दाखले काढण्यासाठीचा अर्ज जमा करताना ठराविक रक्कम भरण्यात येते. त्या रकमेची पावतीही नागरिकांना देण्यात येते. परंतु, मागील काही दिवसांपासून तहसीलदार कार्यालयात दाखला घेतानाही प्रत्येक दाखल्यासाठी दहा रुपयांची मागणी करण्यात येते. या शुल्काची नागरिकांना पावतीही दिली जात नसल्याने ही रक्कम कुठे जाते, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. 

तहसील कार्यालयात रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व इतर विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या ठिकाणी कोणताही दाखला काढण्यासाठी सुरवातीला अर्ज घेऊन कोणत्या प्रकारचा दाखला काढवयाचा आहे, त्याची सविस्तर माहिती भरून त्यासोबत इतर कागदपत्रे जोडावयाची असतात. हा अर्ज कार्यालयात जमा करताना ठराविक रक्कम भरून दिलेल्या तारखेस मिळतो. दाखला घेऊन जाताना प्रति दाखल्यास दहा रुपये मागत आहेत. पावतीशिवाय रक्कम घेणे नियमबाह्य असल्याने दाखले नेताना कर्मचारी व नागरिकांमध्ये वादावादीचे प्रकार घडताना दिसून येत आहे. एका दिवसात सुमारे शंभर दाखले दिले जात असल्याने मिळणारी रक्कमही मोठी आहे. 

कऱ्हाडला चोवीस तास पाणीयोजना पूर्णत्वास; तांत्रिक कामे, निविदांची प्रक्रियाही पूर्ण

दरम्यान, तहसील कार्यालयात अर्ज जमा करताना पावती देऊन पैसे जमा केली होती. मात्र, दाखले काढण्यासाठी गेल्यानंतर कलर प्रिंटसाठी दहा रुपये व झेरॉक्‍स दाखला मोफत दिला जाईल, असे सदर कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, कलर प्रिंटसाठी भरलेल्या रकमेची कोणतीही पावती मिळणार नसल्याचे उत्तर कार्यालयातील कर्मचाऱ्याने दिल्याचे काही नागरिकांनी सांगितले. 

चांदोलीत आढळला सोनेरी पाठीचा बेडूक; सिंधुदुर्गात नामकरण सोहळा

पैसे घेतल्यास तक्रार करण्याचे आवाहन 

दाखल्यांसाठी अर्ज भरताना ठराविक रक्कम घेऊन पावती देण्यात येते. मात्र, दाखले काढताना कोणतीही रक्कम आकारण्यात येत नाही. याबाबत नागरिकांकडून रक्कम घेत असल्यास कार्यालयात तक्रार करण्याचे आवाहन तहसीलदार आशा होळकर यांनी केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे