esakal | "या' तिर्थक्षेत्री भाविकांना प्रवेशबंदी
sakal

बोलून बातमी शोधा

khatav

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा भाग म्हणून खटाव तालुक्‍यातील नागनाथवाडीतील श्री नागनाथ मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर श्रावण महिन्यात भाविकांना गावामध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

"या' तिर्थक्षेत्री भाविकांना प्रवेशबंदी

sakal_logo
By
केशव कचरे

बुध (जि. सातारा) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र नागनाथवाडी (ता. खटाव) येथील श्री नागनाथ मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात या मंदिरात श्रावण महोत्सव साजरा होतो. यंदा हा महोत्सव होणार नाहीत, त्याचबरोबर भाविकांनाही दर्शनासाठी गावात प्रवेश दिला जाणार नाही. 

पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, नागनाथ सेवा मंडळाचे कार्यकर्ते, गुरव संघटना व ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परिसरातील डिस्कळ, चिंचणी, विठ्ठलवाडी, मांजरवाडी, गारवडी येथे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने संक्रमण टाळण्यासाठी भाविकांनाही गावात प्रवेश दिला जाणार नसल्याचे नागनाथ विकास सेवा मंडळाचे अध्यक्ष बबनराव पाटणकर यांनी सांगितले. 

दरवर्षी श्रावण महिन्यात विविध धार्मिक उपक्रमाने येथे श्रावण महोत्सव साजरा करण्यात येतो. येथील स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व शिवरात्रीच्या पर्वकाळात राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक तीर्थक्षेत्र नागनाथवाडी येथे गर्दी करतात. भाविकांची होणारी गर्दी पाहता गेल्या काही वर्षांपासून श्रावण महिन्यातीत प्रत्येक दिवशी भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले होते. मात्र, यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता श्रावण महिन्यात मंदिर बंद ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

निंबळकच्या त्या मृतदेहाचे गुढ उकलले, प्रेमसंबंधातून मेहुणीचाच खून, गिरवीत एकास अटक

loading image