esakal | तब्बल 166 वर्षांपासून या गावात "एक गणपती'ची परंपरा
sakal

बोलून बातमी शोधा

man

नरवणे (ता. माण) येथे 166 वर्षांच्या परंपरेनुसार यंदाही "एक गाव एक गणपती'ची प्रतिष्ठापना होणार आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा वार्षिक यात्रा रद्द करुन सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. 

तब्बल 166 वर्षांपासून या गावात "एक गणपती'ची परंपरा

sakal_logo
By
फिराेज तांबाेळी

गोंदवले (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवातील ढोलाची घाई, मल्लांचा शड्डू आणि हुतुतुच्या आरोळीला शौकीन मुकणार असले, तरी "एक गाव एक गणपती'ची 166 वर्षांची परंपरा नरवणे (ता. माण) येथे कायम राखली जाणार आहे. इतर उपक्रमांऐवजी सामाजिक उपक्रमांचा उत्सव साजरा करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. नेहमीप्रमाणेच यंदाही पौर्णिमेदिवशी पहाटे गणेश विसर्जन होणार असल्याची माहिती यात्रा समितीने दिली. 

ना आवाजाच्या भिंती... ना गुलालाची उधळण... गणेश मूर्तीदेखील इकोफ्रेंडलीच आणि उत्सवात सर्वधर्मियांचा उत्स्फूर्त सहभाग ही गणेशोत्सवाची परंपरा तब्बल 166 वर्षांपासून येथे सुरू आहे. पूर्वीपासूनच अध्यात्म व वारकरी संप्रदायाचे वलय असलेल्या नरवणेत अनेक संत, महात्म्यांचा वारसा आजही लोकांनी जपला आहे. गावातील लोक एकदिलाने एकत्रित यावेत, जातीभेद टाळावा या उद्देशानेच 1855 च्या सुमारास हा उत्सव सुरू करण्यात आला, असे ग्रामस्थ सांगतात. गावाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सर्वेश्वर मंदिरात विविध देवतांसह श्री गणेशमूर्तीही या मंदिरात आहे. या मंदिरातच गणेशोत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते. "एक गाव एक गणपती' उपक्रमाबरोबरच इको फ्रेंडली गणेशमूर्ती, टाळ मृदंगच्या गजरात, तसेच आवाजाच्या भिंती व गुलालविरहित "श्रीं'चे आगमन आणि विसर्जन मिरवणुकीची परंपरा येथे जोपासली जाते. 

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात मोजक्‍या भाविकांच्या उपस्थितीत पहाटे महापूजा, अखंड हरिनाम सप्ताह आदी कार्यक्रम होतील; परंतु दर वर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम, मैदानी स्पर्धा, कुस्त्या, गजीनृत्यावर यंदा पाणी पडले आहे. अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला सायंकाळी "श्रीं'ची मूर्ती विसर्जनासाठी रथात बसवली जाते. मिरवणुकीत दर्शनासह भारुडी भजनाने संपूर्ण रात्र जगविली जाते. पहाटे गणेश विसर्जन होते. या वेळी मात्र अगदी साध्या पद्धतीने मोजक्‍या ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. गणेशोत्सव काळातील इतर कार्यक्रम रद्द झाले असले, तरी सामाजिक दायित्व स्वीकारून लोकांची गर्दी टाळून ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. अन्नदानाऐवजी गरजूंना मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात येणार आहे. 


"एक गाव एक गणपती'ची शतकोत्तर परंपरा कायम राखून सध्याच्या आपत्ती काळात कायद्याच्या चौकटीत राहूनच नरवणेत गणेशोत्सव साजरा करणार आहोत; परंतु यंदा यात्रा होणार नसल्याची खंत आहे. 

- दत्तात्रय काशीद, सदस्य, यात्रा समिती, नरवणे 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

क्रेझी किया रे... हा टॅटू आर्टिस्ट ठरतोय युवकांत हिट 

loading image
go to top