esakal | अखेर गळाभेटीनेच संपली तिची व्याकुळता...
sakal

बोलून बातमी शोधा

सणबूर : मामाच्या गावाहून सोमवारी मध्यरात्री घरी पोचल्यानंतर आईसमवेत अनुष्का.

सुटीत मामाच्या गावी गेलेली दहा वर्षांची चिमुरडी आईच्या आठवणीने व्याकुळ झाली. लॉकडाउनमुळे वडापही बंद असलेल्या स्थितीत घरी परतणे लांबतच चालल्याचे लक्षात आल्यावर अखेर रात्रीच्या सुमारास "ती' गुपचूप तडक बारा किलोमीटरवरील गावी जाण्यास निघाली. 

अखेर गळाभेटीनेच संपली तिची व्याकुळता...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी (जि. सातारा) : गर्द अंधार, पाऊस कापत रात्री बाराच्या सुमारास निर्जन रस्त्याने एकटी निघालेली चिमुकली पोलिस मित्र आणि गृहरक्षक दलाच्या जवानांच्या नजरेला पडली. त्यांनी तिची विचारपूस केली स्वतःच्या मोटारीतून घरी पोचवत मायलेकीची भेटही घडवून आणली. ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावर सणबूर (ता. पाटण) येथे प्रसंग घडला. 

सणबूर येथील अनुष्का जाधव ही चिमुरडी काही दिवसांपूर्वी आपल्या आजोळी तारुख (ता. कऱ्हाड) येथे मुक्कामी होती. थोडे दिवस तिकडे राहिल्यानंतर आईच्या आठवणीने तिने गावी जाण्याचा हट्ट मामाकडे धरला. मामाच्या घरी शेतीच्या कामाची घाई आणि लॉकडाउनमुळे गावाकडचे वडापही बंद अशा परिस्थितीत घरी जाणे लांबले. अखेर सणबूरला पायी चालत जायचा निर्धार करून रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडली.

अंधार, पाऊस कापत रात्री निर्जन रस्त्याने चिमुकली एकटीच चालली. ढेबेवाडी ते कऱ्हाड रस्त्यावर काढणे-मानेगाव दरम्यानच्या म्हसोबा देवस्थानानजीक गृहरक्षक दलाचे जवान रवी लोहार, गणेश डाकवे, पोलिस मित्र उमेश माने यांच्या ती नजरेस पडली. त्यांनी तिची विचारपूस केल्यानंतर सणबूरचे उपसरपंच संदीप जाधव यांच्याशी त्यांनी मोबाईलवर संपर्क साधत वस्थुस्थिती सांगितली. त्यानंतर श्री. माने यांनी स्वतःच्या मोटारीतून त्या चिमुकलीला सणबूर येथील तिच्या घरी पोचवले. मायलेकीची भेटही घडवून आणली.

काहीवेळ रडतच त्या दोघी एकमेकींच्या मिठीत विसावल्या. तारुखमध्येही तिची शोधाशोध सुरू होती. भाची सुखरूप गावी पोचल्याचे समजल्यानंतर मामा व त्यांच्या कुटुंबीयांचाही जीव भांड्यात पडला. अनुष्का नुकतीच चौथीतून पाचवीत गेली आहे. 
 

चुकला काळजाचा ठाेका... चालकाविनाच चाललेल्‍या मोटारीचा अखेर टळला धोका...