
Udayanraje Bhosale : उदयनराजेंना रोखण्यास राष्ट्रवादीची व्यूहरचना; आमदार शशिकांत शिंदेंवर दिली ही जबाबदारी
सातारा - सातारा लोकसभेसाठी भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांना रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात पक्षबांधणीस सुरुवात केली आहे. त्यासाठी बूथ सक्षमीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्याची जबाबदारी विभागीय बूथ प्रमुख म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर दिली आहे. आठही विधानसभा मतदारसंघांत त्यांनी बूथ बांधणीसाठी तयारी सुरू केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभेसाठी आमदारांनी तयारी करावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे श्री. पवार सातारा लोकसभेसाठी कोणाचे नाव पुढे करणार? याची उत्सुकता आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादीचे विधानसभेचे तीन आमदार असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांत राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकीनंतर भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पोखरला आहे. भाजपचे दोन आमदार व दोन खासदार जिल्ह्यात आहेत. हातून निघालेला बालेकिल्ला पुन्हा मिळवून त्यावर आपली पक्कड निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात लक्ष घालण्याची सूचना आमदारांना केली आहे.
त्यानुसार आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर विभागीय बूथ प्रमुख म्हणून जबाबदारी देत सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. आता आमदार शिंदे यांनी जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत बूथ बांधणी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी येत्या शनिवारी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक साताऱ्यात होत आहे. बूथ बांधणी करून ते सक्षम करण्यासाठी एका बूथ समितीत दहा सदस्य असतील.
भाजपने यापूर्वीच बूथ सक्षमीकरणावर भर दिला आहे. त्यामुळे भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी करूनच चक्रव्यूह आखून रिंगणात उतरण्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्यानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत सातारा व माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचाच खासदार कसा निवडून येईल, यावर विशेष भर राहणार आहे.
सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंना टक्कर देणारा चेहरा राष्ट्रवादीकडे नाही. जे इच्छुक आहेत, त्यांची पोच एक-दोन मतदार संघापुरती आहे. कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण व पाटण मतदारसंघानेच श्रीनिवास पाटील यांना गेल्या निवडणुकीत मताधिक्य मिळवून दिले आहे. त्यामुळे आगामी काळात उदयनराजे हेच भाजपचे उमेदवार असतील, असे गृहीत धरून राष्ट्रवादीने सातारा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात पक्षबांधणीस सुरुवात केली आहे. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांनी लोकसभेसाठी तयारी करावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे खासदार श्री. पवार सातारा लोकसभेसाठी कोणाचे नाव पुढे करणार, याचीच उत्सुकता आहे.
आमदारांचा प्रयोग...
खासदार उदयनराजेंना टक्कर देणारे श्रीनिवास पाटील यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही सक्षम उमेदवार सध्यातरी राष्ट्रवादीकडे नाही. इतर इच्छुक असलेल्यांपैकी कोणीही त्यांच्यापुढे टिकेल, याची खात्री नाही. तरीही शरद पवार यांनी ऐनवेळी शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील या तीन आमदारांपैकी एकाला रिंगणात उतरवले तर त्यांना झगडावे लागेल. पराभूत झाले तरी, त्यांना त्यांचा विधानसभेचा मतदारसंघही गमवावा लागणार आहे. त्यामुळे श्रीनिवास पाटील यांच्यासारखाच उमेदवार त्यांना द्यावा लागेल.