सातारा जिल्हा बॅंकेत "युपीआय' सेवा

उमेश बांबरे | Saturday, 29 August 2020

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस भारतीय राष्ट्रीय पेमेंट निगमने (एनपीसीआय) युनिफाइड पेमेंट इंटरफेस (युपीआय) प्रणालीचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सभासदांना आता घरबसल्या व्यवहार करता येतील. 

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस भारतीय राष्ट्रीय पेमेंट निगमने (एनपीसीआय) युनिफाइड पेमेंट इंटरफेस (युपीआय) प्रणालीचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. त्याचे उद्‌घाटन एन. पी. सी. आय. चे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी अनुप नायर यांच्या हस्ते मुंबईहून ऑनलाइन पध्दतीने झाले. 

या वेळी विधान परिषदेचे सभापती व बॅंकेचे संचालक रामराजे नाईक-निंबाळकर, बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजपुरे, राजेश पाटील, अनिल देसाई, प्रकाश बडेकर, प्रदीप विधाते, अर्जुनराव खाडे, वसंतराव मानकुमरे, संचालिका कांचन साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

रामराजे म्हणाले,"" एनपीसीआयने बॅंकेस मान्यता देऊन बॅंकेच्या कार्यपद्धतीवर पसंतीची मोहोर उमटवली आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेस (युपीआय) प्रणालीचा वापर करून जिल्हा बॅंकेने ग्राहकांसाठी डिजिटल पेमेंटचा सर्वोत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मुळात बॅंकेचा सहकारी बॅंकिंग क्षेत्रात महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातही नावलौकिक असून, जिल्ह्यामध्ये ग्रामीण व कृषी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.'' 

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले,"" बॅंकेने ग्राहकांना 2013 मध्ये डिजिटल बॅंकिंग सेवा देण्यास सुरवात केली आहे. यामध्ये काळानुरूप झालेले बदलानुसार ग्राहकांना आधुनिक बॅंकिंगच्या सर्व सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. ग्राहकांना नेहमीच गुणात्मक व तप्तर सेवा देण्यामध्ये अग्रेसर आहे. बॅंक युपीआय सर्व्हरला लिंक झाल्यामुळे ग्राहकांना गुगल पे, फोन पे, पेटीएम, फ्री चार्ज, जिओ मनीद्वारे फोन बिल, लाइट बिल भरणे, मोबाईल रिचार्ज, ई-कॉमर्स आदी सेवा उपलब्ध झाल्या आहेत.'' 

डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले,"" जिल्हा बॅंक युपीआय सर्व्हरला लिंक झाल्यामुळे बॅंकेच्या ग्राहकाला कोणतेही डिजिटल व्यवहार घरबसल्या करता येणार आहेत. बॅंक आयएसओ सर्टिफाइड असून, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये टॉप को-ऑपरेटिव्ह बॅंक म्हणून नोंद झालेली नामांकित बॅंक आहे.'' 

अनुप नायर म्हणाले,"" जिल्हा बॅंक महाराष्ट्रातील नावलौकिकप्राप्त बॅंक असून, ग्राहकांना डिजिटल सेवा देण्यामध्ये अग्रेसर आहे. डिजिटल बॅंकिंग व्यवहारासाठी राज्यातील सहकारी बॅंकांना सातारा जिल्हा सहकारी बॅंकेने सुविधा उपलब्ध करून देऊन या बॅंकांना दिशा देण्याचे काम करावे.'' 

(संपादन ः पांडूरंग बर्गे) 

 

आमच्यात भेदभाव कशासाठी?, सैनिकांचा सरकारला सवाल