Satara : घरगुती गॅसवर वाहने सुसाट ; वाहनांना धोका, कारवाईची गरज Satara Vehicles run domestic gas ehicles need action | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gas

Satara : घरगुती गॅसवर वाहने सुसाट ; वाहनांना धोका, कारवाईची गरज

सातारा : गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅसचा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. वाहनचालक एलपीजी गॅसचे किट खरेदी करून घरगुती गॅस वाहनांमधील किटमध्ये भरून काळाबाजार करत आहेत. या गैरप्रकारामुळे वाहनांना धोका निर्माण होत असून, रिक्षाचालक व इतर वाहनचालक हा प्रकार अधिक प्रमाणात करत आहेत. उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) या वाहनांची तपासणी करून कारवाई करणे आवश्‍यक आहे.

पेट्रोल वाहनांमध्ये कंपनीचे गॅस कीट असणे आवश्‍यक आहे. मात्र, मागील काही दिवसांत वाहनचालक सरार्सपणे बाजारातून साधे कुठलीही गॅरंटी-वॉरंटी नसणारे किट खरेदी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या किटमध्ये घरगुती गॅस जादा पैसे देऊन खरेदी करत चुकीचा वापर करत आहेत.

या गॅस किटमध्ये हातपंपाने घरगुती एलपीजीमधील गॅस भरून वाहने चालविली जात आहेत. या प्रकारामुळे वाहनांच्या इंजिनलाही धोका निर्माण होत असून, कुठलाही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत वाहनविक्री व्यावसायिकांनी वारंवार सूचना करूनदेखील वाहनचालकांना गैरप्रकार थांबत नसल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, घरगुती गॅसचा वापर खटाव, मायणी या भागात जास्त प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. घरगुती गॅस साध्या किटमध्ये भरण्याचा प्रकार धोकादायक असून, या गैरप्रकाराला चाफ बसण्यासाठी आरटीओ विभागाने कडक पावले उचलण्याची गरज आहे. याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून कारवाई करण्याची मागणी वाहन विक्री व्यावसायिकांनी केली आहे.