
सातारा : कामेरीच्या चिमुरडीकडून ‘वजीर’ सर
सातारा (नागठाणे) : शारीरिक कस, दुर्दम्य इच्छाशक्ती अन् अतुलनीय साहस याचे दर्शन घडविताना सहा वर्षांच्या चिमुरडीने अवघड ठरणारा वजीर सुळका पार केला. उल्लेखनीय म्हणजे अवघ्या ३० मिनिटांत तिने ही कामगिरी फत्ते केली.
आरोही सचिन लोखंडे हे या चिमुरडीचे नाव. सातारा तालुक्यातील कामेरी हे तिचे गाव. बालदिनाचे औचित्य साधताना शेतकरी कुटुंबातील मुलीने हे साहसी यश संपादन केले. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेला वजीर सुळका तिने सर केला. माहुली किल्ल्यालगत काही अंतरावर हा सुळका आहे. सुमारे २५० फूट इतकी त्याची उंची आहे. चढाईच्या दृष्टीने त्याची कठीण श्रेणीत गणना होते. या मोहिमेत आरोही सहभागी झाली होती. पहाटे पाचच्या सुमारास तिने माहुली किल्ला चढण्यास प्रारंभ केला. दोन तासांत ती किल्ल्यावर पोचली. त्यानंतर दुपारी १२ वाजता वजीर सुळक्याची चढाई सुरू झाली. २५० फुटांची ९० अंशातील सरळ उभी चढण तिने लीलया पार केली. रॅपलिंग अन् कॅबलिंग करत तिने हा अवघड टप्पा पूर्ण केला. त्यासाठी ‘पॉइंट ब्रेक टीम’चे जॉकी साळुंखे, समीर भिसे, चेतन शिंदे यांचे मार्गदर्शन तिला लाभले. सचिन लोखंडे, राहुल घाडगे, नवनाथ घाडगे, भरत घाडगे, डॉ. संदीप भिंगारदिवे, संतोष निकम, अनुजा निकम, अजय गडांकुश, अक्षय पोळ यांनीही मोलाचे सहकार्य केले.
काटक अन् चपळ...
आरोही ही गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकते. इयत्ता पहिलीची ती विद्यार्थिनी. बालपणापासूनच ती अत्यंत काटक अन् चपळ आहे. ती उत्तमपणे सायकल चालविते. पोहण्यात ती तरबेज आहे. तिचे वडील सचिन लोखंडे यांनी तिला सुरवातीपासूनच खेळाडू म्हणून घडविण्यासाठी परिश्रम घेतले.