सातारा : कऱ्हाडात प्रतिष्ठेच्या लढाईत बाजी कुणाची? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election

सातारा : कऱ्हाडात प्रतिष्ठेच्या लढाईत बाजी कुणाची?

सातारा (कऱ्हाड) : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत कऱ्हाड सोसायटी गटातून सहकारमंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सुपुत्र अॅड. उदयसिंह यांच्यात लढत होत आहे. दोघांनीही आपले पत्ते ओपन करून फिल्‍डिंग लावली आहे. सहकारमंत्र्यांनी बेरजेचे राजकारण करत थेट भोसले गटालाच मदतीसाठी साद घातली आहे, तर उंडाळकरांची आपल्या कट्टर समर्थकांवर मदार आहे. त्यामुळे कऱ्हाडची लढत ही प्रतिष्ठेची बनली आहे.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी मोठ्या राजकीय उलाढाली झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना विचारात घेऊन जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, त्याला पूर्णपणे यश आले नाही. इच्छुकांची संख्या वाढल्याने जिल्हा बॅंकेच्या २१ जागांपैकी ११ जागा बिनविरोध झाल्या, तर उर्वरित १० जागांसाठी निवडणूक लागली आहे. त्यासाठी २० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा बॅंकेसाठीच्या कऱ्हाड सोसायटी गटात १४० मते आहेत. सहकारमंत्री पाटील हे या सोसायटी गटातून कौल आजमावत आहेत. त्यांनी यावेळच्या निवडणुकीसाठी पारंपरिक विरोधक असलेल्या भोसले गटालाच थेट मदतीसाठी साद घातली आहे. कालच त्यांची नावे व फोटो पत्रिकेत छापून सहकारमंत्र्यांनी ते दाखवूनही दिले.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

दरम्यान, त्यांच्याविरोधात असलेल्या अॅड. उंडाळकर यांनीही सोसायटी गट हा माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांचा पारंपरिक मतदारसंघ असल्याचे सांगत त्याच गटातून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे. त्यांची मदार ही आपल्या गटाच्या कट्टर समर्थकांवर आहे. सहकारमंत्रीच विरोधात असल्याने ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीच्या निकालावर भविष्यातील बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकांची रणनीती ठरणार आहे. त्यातच कालच भोसले गटाचे ज्‍येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी ''माझी मते सहकारमंत्र्यांना आणि यापुढच्या निवडणुका आपण एकत्र लढू,’ असे आवाहन केले आहे. त्यामुळे या निवडणुकीचा गुलाल कोणाच्या अंगावर पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एका-एका मतासाठी रस्सीखेच

सातारा जिल्हा बॅंकेसाठीच्या कऱ्हाड सोसायटी गटात १४० मते आहेत. त्या गटातील जास्तीत जास्त मते आपल्यालाच मिळावीत, यासाठी सहकारमंत्री पाटील व ॲड. उंडाळकर यांनी मोठी फिल्‍डिंग लावली आहे. एका-एका मतासाठी त्यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही नेत्यांनी विजयाचा दावा केल्याने मतदारांचा कौल कोणाला मिळणार, याबाबत जिल्ह्यात मोठी उत्सुकता आहे.

loading image
go to top