परिवर्तनासाठी एकवटली तरुणाई, वृक्षारोपण, वाचनालयासह राबविणार विविध उपक्रम

Satara
Satara

मायणी (जि. सातारा) : धोंडेवाडी (ता. खटाव) येथील उच्चशिक्षित तरुणांनी राजकारणविरहित एकोप्याची मोळी बांधून गावाच्या सर्वांगीण विकासाचे शिवधनुष्य उचलले आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

धोंडेवाडीतील तरुणांनी एकत्र येत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काय काय करता येईल, याबाबत नियमित बैठका घेऊन आराखडा तयार करण्यात येत आहे. वृक्षारोपण करून त्यांनी परिवर्तनाचे रणसिंग फुंकले आहे. रस्त्याच्या दुतर्फा दोन किलोमीटर वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यासाठी पदरमोड करून 25 ते 30 तरुणांनी जेसीबीच्या साह्याने खड्डे काढले. माती भरून घेतली. सावली देणाऱ्या वृक्षांचे रोपण केले. झाडांना टॅंकरने पाणी दिले जात आहे. गावातही घरोघरी विविध प्रकारची रोपे वाटप करून ती शेतबांधावर, परसबागेत लावण्याचे व संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गावातील नागरिक, पालक व विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी उत्तम वाचनालय उभारणीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीही त्यांनी स्वनिधी निर्माण केला आहे. त्यांच्या परिवर्तनाच्या चळवळीला गावातील, तसेच पुण्या-मुंबईसह ठिकठिकाणी नोकरी व्यवसायात असलेले अनेक मदतीचा हात पुढे करत आहेत. गावातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी तेथील अडचणी, गैरसोयी दूर करून आवश्‍यक ती पावले उचलण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी आपली मुले शिक्षणासाठी अन्यत्र न पाठवता गावातील प्राथमिक शाळा व चंद्रसेन विद्यामंदिर या हायस्कूलमध्येच घालावीत, यासाठी पालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

गावात अनेक पडकी घरे, खिंडारे आहेत, तेथे स्वच्छता करून त्या जागेचा सर्वसंमतीने समाजासाठी उपयोग करणे यांसह गावाच्या सुशोभीकरणासाठी मिरज-भिगवण या राज्यमार्गालगत आकर्षक प्रवेशद्वार (स्वागत कमान) बांधण्याचे नियोजन केले आहे. गाव विमाग्राम झाल्यामुळे आयुर्विमा महामंडळाकडून कमानीसाठीचा निधीही मंजूर झाल्याचे तरुणांनी सांगितले. गावाच्या विकासकार्यात ग्रामपंचायत, विविध संघटना, मंडळांनी बिनशर्त व राजकारण बाजूला ठेवून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. अमोल तु. घाडगे, अमोल ता. घाडगे, अमोल पां. घाडगे, नानासाहेब घाडगे, केशव घाडगे, नवनाथ घाडगे, सुरेंद्र घाडगे, राहुल घाडगे, जगन्नाथ घाडगे, सचिन घाडगे, प्रमोद घाडगे आदी तरुण परिवर्तनाची लढाई नेटाने लढत आहेत. 


""गावातील तरुणांचा परिवर्तन चळवळीस पाठिंबा मिळत आहे. सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी एकत्र आल्यास खूप काही करणे शक्‍य होणार आहे.'' 
-अमोल घाडगे, परिवर्तन चळवळ कार्यकर्ता 

संपादन : पांडुरंग बर्गे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com