जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आता इच्छुकांनी नेत्यांशी संपर्क वाढविला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP-Satara

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आता इच्छुकांनी नेत्यांशी संपर्क वाढविला

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आता इच्छुकांनी उमेदवारीसाठी नेत्यांशी संपर्क वाढविला आहे. यावेळी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने गट, गणनिहाय उमेदवार ठरविताना विविध पक्षाच्या नेत्यांचा कस लागणार आहे. यातूनच बंडखोरीची चिन्हे आहेत. प्रमुख पक्षांतील इच्छुकांनी आता आपापल्या गट, गणात विकासकामांची उद्‌घाटने, भूमिपूजनांवर भर दिला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गट, गणनिहाय इच्छुकांची माहिती जमा करण्याचे काम सुरू केले आहे. यादी तयार होताच प्रमुख नेतेमंडळी एकत्र बसून उमेदवारांची चाचपणी करतील.

जिल्हा परिषदेची यावेळची निवडणूक चुरशीची होणार आहे. यावेळी भाजपला कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेत पाय रोवायचे आहेत. राष्ट्रवादीने तर गट, गणनिहाय इच्छुकांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. यादीत इच्छुकांची संख्या यावेळेस मोठी असेल. खुल्या गटात आजपर्यंत इच्छुकांची संख्या अधिक असायची पण, यावेळी ओबीसींसाठी राखीव झालेल्या ठिकाणीही इच्छुकांची संख्या जास्त असेल. यावेळी इच्छुकांपुढे पाच पक्षांचे पर्याय आहेत. त्यापैकी भाजप व राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस, शिवसेना, रासप, मनसे, रिपाइं, वंचित आघाडीची ताकद असणार आहे. त्यामुळे ज्यांना पक्षातून उमेदवारी मिळणार नाही, त्यांच्यापुढे एकनाथ शिंदे गटाच्‍या पर्यायाची चर्चा आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यभरातील दिग्गज नेत्यांचे दौरे यानिमित्ताने सुरू होणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या रणांगणात पक्षाच्या दिग्गज नेत्यांची रणधुमाळी पाहायला मिळेल. यावेळी सर्वजण स्वतंत्रपणे आपापली ताकद आजमावत असल्याने सर्वांना जास्तीत जास्त जागा निवडून आणून जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करायची आहे. तर जास्तीत जास्त पंचायत समितींत भाजपला प्रवेश मिळवायचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पोखरण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न होणार, हे नक्की. त्यासाठी भाजपने कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याची भूमिका घेतली आहे.