
झेडपीच्या ८२ कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी
सातारा - जिल्हा परिषदेचे महसुली उत्पन्न ८२ कोटी रुपये गृहित धरून ८१ कोटी ९९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास जिल्हा परिषदेच्या ठराव समितीने मंजुरी दिली. मूळ अंदाजपत्रक ५० कोटींचे होते. त्यात पुरवणी अंदाजपत्रकाची ३२ कोटींची भर पडली आहे. पुरवणी अंदाजपत्रकामध्ये शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण विभागास भरघोस निधी देण्यात आला असून, विविध योजनांना प्राधान्य देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या ठराव समितीची सभा आज श्री. गौडा यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात झाली. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. प्रशासक गौडा यांनी पुरवणी अंदाजपत्रक सादर केले.
जिल्हा परिषदेने स्वउत्पन्नाचे पुरवणी अंदाजपत्रक तयार केले असून, सर्व विभागाकडील सन २०२१-२२ अखेरच्या जिल्हा परिषदेच्या स्वनिधीच्या दायित्वावरील खर्च भागविण्याच्या दृष्टीने अंदाजपत्रकांचे एकत्रीकरण करून २०२२-२३ चे पुरवणी अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मूळ अंदाजपत्रकात ४९ कोटी ९९ लाख रुपयांची तरतूद करत एक लाख रुपये शिल्लक दाखवण्यात आले होते.
सामान्य प्रशासन विभाग २५ लाख रुपये, शिक्षण विभाग तीन कोटी ९२ लाख, बांधकाम विभाग १८ कोटी ११ लाख १२ हजार, लघुपाटबंधारे विभाग एक कोटी ३६ लाख ५७ हजार, आरोग्य विभाग ४ कोटी ९ लाख ५० हजार, पशुसंवर्धन विभाग १९ लाख, समाजकल्याण विभाग ३ कोटी ४ लाख ४६ हजार, संकीर्ण (सामान्य) एक कोटी ७४ लाख २५ हजार, महिला व बालकल्याण विभाग २ लाख ६८ हजार, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग १६ लाख ५० हजार रुपये अशी ३२ कोटी रुपयांची तरतूद पुरवणी अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी पुरवणी अंदाजपत्रकामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सद्यःस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने जिल्हा परिषदेच्या विविध विभागांसाठी मूळ अंदाजपत्रकात ५० कोटी व पुरवणी अंदाजपत्रकात ३२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत लोककल्याणकारी योजनांना प्राधान्य देण्यात येत आहे.
- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी.
Web Title: Satara Zps Budget Of 82 Crores Approved
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..