सातारा : शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश

जिल्ह्यात ८३ हजार विद्यार्थ्यांना होणार मोफत वाटप; चार कोटी ९९ लाख ४४ हजारांची तरतूद
Satara ZP
Satara ZPSakal

सातारा - कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन सुरू होते. यावर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्याने आता ऑफलाइन शिक्षणाची विद्यार्थ्यांनाही उत्सुकता आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांना सध्‍या उन्हाळी सुटी आहे. मात्र, नवीन शैक्षणिक वर्षाचे नियोजन प्राथमिक शिक्षण विभागामार्फत केले आहे. जिल्ह्यातील ८३ हजार २४१ विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी १३ जूनला मोफत गणवेशाचे वाटप होणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने चार कोटी ९९ लाख ४४ हजार रुपयांची तरतूद केली आहे.

मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यानंतर त्याचा वेग वाढत गेला. त्यामुळे गेली दोन वर्षे विविध क्षेत्रावर कोरोनाचा परिणाम झाला. तसा शिक्षणावरही त्याचा परिणाम झाला. त्यामुळे कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध झाला. जून २०२१ मध्ये कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर काही दिवस ऑफलाइन शाळा सुरूही झाल्या होत्या. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने शाळा, महाविद्यालये शासनाने बंद केली. त्यानंतर कोरोनाचे संकट कमी झाल्याने जानेवारी २०२२ मध्ये शाळा पुन्हा सुरू झाल्या. त्यामुळे शिक्षण विभागाने परीक्षा ऑफलाइन घेत एप्रिल महिन्यात शाळांना सुट्या दिल्या.

जूनमध्ये शाळा सुरू होणार आहेत. त्यात आता कोरोनाचा संसर्गही कमी झाल्याने विद्यार्थ्यांना ऑफलाइची शिक्षणाची चाहूल लागली आहे. शिक्षण विभागाने त्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीमधील मुले, दारिद्र्यरेषेखालील मुलांसाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश वाटप करण्यात येते. गणवेश योजनेची मंजूर तरतूद शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने खर्च करावी लागणार आहे. हा निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर येत्या आठवडाभरात वर्ग केला जाणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगितले आहे.

विद्यार्थ्यांना वर्षात दोन गणवेश

समग्र शिक्षण अभियानांतर्गत प्रति गणवेश तीनशे रुपयांप्रमाणे दोन गणवेशासाठी सहाशे रुपये निधीची तरतूद केली आहे. त्यातून विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातील. यात जावळी तालुक्यात तीन हजार ७३०, कऱ्हाड १४ हजार ८०२, कोरेगाव सहा हजार ३७९, खटाव पाच हजार ४९, खंडाळा आठ हजार ७२, महाबळेश्वर दोन हजार २३९, माण सात हजार २७०, पाटण आठ हजार ८११, फलटण ११ हजार ५९, सातारा नऊ हजार ८५३, वाई तालुक्यात पाच हजार ९७७ असे ८३ हजार २४९ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com