वाई : शिवीगाळ केल्याच्या कारणावरून शेंदूरजने येथे एका कामगारांचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 killed worker

वाई : शिवीगाळ केल्याच्या कारणावरून शेंदूरजने येथे एका कामगारांचा खून

वाई : दारूच्या नशेत अर्वाच्चा भाषेत शिवीगाळ केल्याच्या कारणावरून तिघांनी लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने पारडीढवरे (ता.नागभीड, जि. चंद्रपूर ) येथील एका कामगारांचा मृत्यू झाला. शेंदूरजने (ता.वाई) येथील मेप्रो फूड प्रा.लि. या कंपनीच्यामागे कच्च्या रस्त्यावर शुक्रवारी (ता.८) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भानुदास मारुती शेंडे (वय ३५ वर्षे ) असे मृत कामगारांचे नाव आहे. या प्रकरणी प्रफुल्ल आनंदराव चन्नेकर (वय.२९ वर्षे) व मनोज भास्कर संगेल (वय २५ वर्षे, दोघेही रा.तलोदी ता.नागभीड जि. चंद्रपूर) तसेच जितेंद्र प्रभाकर नेवारे (वय २८ वर्षे रा.नवेगाव हुंडेश्वरी ता.नागभीड जि.चंद्रपूर) या तीन संशयितांना वाई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत कंपनीतील सुरक्षा रक्षक शंकर अनिल यादव याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेंदूरजने (ता.वाई, जि. सातारा ) येथील मेप्रो फूड प्रा.लि. कंपनीत भानुदास शेंडे हा कामगार दोन वर्षांपासून कामास होता. त्यास दारूचे व्यसन होते.दारूच्या नशेत तो सोबतच्या कामगारांना अर्वाच्चा भाषेत शिवीगाळ करीत असे. शुक्रवारी (ता.८) रात्री आठ वाजता कामावरून सुटल्यानंतरत्याने सोबत रहात असलेल्या कामगारांना शिवीगाळ केली. त्याचा राग मनात धरून प्रफुल्ल चन्नेकरी, मनोज संगेल,जितेंद्र नेवारे या तिघांनी संगनमत करून त्यास लोखंडी पाईप, लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. सकाळी सात वाजता ही बाब सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आली.

त्याने कंपनीच्या व्यवस्थापनास याबाबतची माहिती दिली. त्यानंतर व्यवस्थापनाने तातडीने वाई पोलिसांशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यावर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी ठसे तज्ञांना प्राचारण करण्यात आले. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे करीत आहेत.

Web Title: Shendoorjan Wai Killed Worker Abusing Police Arrested Three Suspects

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..