भरली ओंजळ आपली; सांडणारी समाजाची : शिंदे बंधूंची गरजूंसाठी धाव

संजय साळुंखे | Thursday, 24 September 2020

हे सारे करत असताना हणमंतआबा आणि शिंदे बंधूंची भावना-प्रतिक्रिया वेगळीच आहे. आम्ही मदत करणारे कोण? आमच्याकडून हे कुणी तरी करून घेतंय, असे सांगत त्यांची बोटे आकाशाकडे असतात. आर्थिक समृद्धी आली तरी दातृत्वाची भावना विरळच असते.

सातारा : "ओंजळ भरली की सांडणारं समाजाचं असतं. ते समाजाला परत करायचं असतं... सुखात नसली तरी दुःखात आपली सोबत महत्त्वाची असते..', ही खरं तर पुस्तकात, भाषणात शोभणारी, प्रसंगी टाळ्या घेणारी, भारावून टाकणारी वाक्‍ये; पण प्रत्यक्षात प्रसंग येतो तेव्हा भरून वाहणाऱ्या ओंजळीचं राहू द्या; पण रिकामा हातही आखडता घेण्याच्या या काळात आखाडकर सचिन व संदीप या शिंदे बंधूंनी आपल्या संवेदना जाग्या ठेवत अनेकांना कठीण प्रसंगात सोबत देण्याचा सातत्याने प्रयत्न चालवला आहे.
 
जावळी तालुक्‍यातील प्रत्येक घरातील किमान एक माणूस रोजगारासाठी मुंबईला आहेच. आजही बहुतांशाने हेच चित्र आहे. 70-80 वर्षांपूर्वी विश्वासराव शिंदे (काका) मुंबईला गेले. मुंबईत बस्तान बसवताना पुढे बंधू, मुले-पुतण्यांनीही मुंबईची वाट चोखाळली. आज याच (कै.) विश्वासराव काकांचे सुपुत्र हणमंतराव आणि त्यांचे तीनही नातू संतोष, सचिन आणि संदीप यांनी आपल्या बुद्धीकौशल्याने, दूरदर्शी दृष्टीने जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर मुंबईत उद्योग-व्यवसायात स्थिरावण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय. या साऱ्या प्रवासात त्यांनी आपल्या मायपांढरीची, परिसराबद्दलची बांधिलकीची भावना जागी ठेवली आहे. कुणाच्या हाकेची वाट न पाहता या कुटुंबाने संकटाच्या प्रत्येक प्रसंगात आपले समाजाप्रतीचे उत्तरदायित्व निभावले. हुमगावचे "रयत'चे विद्यालय असो की, आखाडेची प्राथमिक शाळा असो, मंदिर असो... हे शिंदे बंधू विशेषतः हणमंतरावआबा आणि त्यांची सचिन, संदीप ही मुलं पडत्या घराच्या तुळईला खांदा देण्यात कायम पुढे राहत आली आहेत.

आळंदी-पंढरपूर महामार्ग निर्मितीत भ्रष्टाचार : खासदार रणजितसिंह निंबाळकर
 
गतवर्षी पावसाने शिरोळ (जि. कोल्हापूर) शहर पाण्याखाली गेलं होतं. सचिन आणि संदीप यांनी खाण्याच्या विविध पदार्थांपासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत सारे साहित्य ट्रकद्वारे शिरोळपर्यंत आणि तिथून दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्यामार्फत हेलिकॉफ्टरद्वारा पूरग्रस्तांपर्यंत पोच केले. पूरपरिस्थिती निवळली तरी शुद्ध पाण्याचा प्रश्न होताच. सचिन-संदीप यांनी पाणी शुद्धीकरणासाठी लागणारी ब्लिचिंग पावडरचे दोन ट्रक शिरोळ शहर आणि परिसरात रवाना केले. 
पूरपरिस्थितीतून सावरत असतानाच "कोरोना'चे संकट नव्याने उभे राहिले. "लॉकडाउन'च्या काळात हातावर पोट असणारांकडे या शिंदे बंधूंनी विशेष लक्ष पुरवले. गाव बंधू प्रशांत, रणजित, विक्रम, संजय आदींमार्फत परिस्थितीवर लक्ष ठेवताना गावातील कातकरी बांधव असो की, अन्य कुणी गरजू... हणमंतआबा आणि सचिन-संदीपची मदत झाली नाही, असे कधीच होत नाही. अलीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ऑक्‍सिजन यंत्रांचा तुटवडा लक्षात घेऊन चार यंत्रे आणि जवळपास 20 हजार मास्क संबंधित यंत्रणेकडे सुपूर्द केले.

मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांनीच केला थातूर मातूरपणा : पृथ्वीराज चव्हाण
 
हे सारे करत असताना हणमंतआबा आणि शिंदे बंधूंची भावना-प्रतिक्रिया वेगळीच आहे. आम्ही मदत करणारे कोण? आमच्याकडून हे कुणी तरी करून घेतंय, असे सांगत त्यांची बोटे आकाशाकडे असतात. आर्थिक समृद्धी आली तरी दातृत्वाची भावना विरळच असते. स्वतः स्थिरस्थावर होत असतानाच्या काळात गावाशी तुटू लागलेली नाळ पुन्हा जोडत अनेकांच्या दुःखाशी स्वतःला तन-मन-धनाने जोडण्याच्या सचिन-संदीपच्या या सामाजिक बांधिलकीचे आणि निरपेक्ष भावाचे सर्वत्र स्वागत-कौतुक होत आहे.

नवरात्राेत्सव रद्द करुन 'धर्मवीर'चा कोरोनाबाधितांसाठी झटण्याचा निर्णय 

आपल्याकडं होतंच काय आणि वर जाताना तरी काय बरोबर येणार आहे? आपली ओंजळ भरली ना. मग, सांडणारं आपलं नाहीच, ते समाजाचं... समाजाला परत करूया... ही साईबाबांची शिकवण.. तीच पुढे नेऊया! 

- हणमंतराव शिंदे (आबा) 

Edited By : Siddharth Latkar