
Shivendra Singh Raje : भुयारी गटार योजना ठेकेदाराला पोसण्यासाठी; शिवेंद्रसिंहराजे
सातारा : सातारा शहरात सुरू असलेली भुयारी गटार योजना ही पांढरा हत्ती ठरली आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यांना साताऱ्याच्या विकासाचे घेणे- देणे नसल्यामुळे ही योजना केवळ ठेकेदाराला पोसण्यासाठी आहे, असा घणाघाती आरोप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. या वेळी सातारा विकास आघाडीच्या पालिकेतील कारभारावर त्यांनी सडेतोड टीका केली.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘सातारा शहरात सध्या धुळीचे साम्राज्य सुरू असून, भुयारी गटार योजना हा प्रशासकीय दृष्ट्या पांढरा हत्ती ठरली आहे. शहराच्या पश्चिम भागात बोगदा ते बुधवार पेठ यादरम्यान या योजनेचे केवळ २० टक्के काम झाले आहे. अजून दोन टप्प्यांत ही योजना संपूर्ण शहरात लागू करावयाची आहे.
मोती चौक ते राधिका चौक या दरम्यानच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर सध्या धुळीचे साम्राज्य आहे. प्रशासक या नात्याने अभिजित बापट यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली. मात्र, ठेकेदार हा निर्ढावलेला असून, त्याला सातारकरांच्या आरोग्याची कोणतेच देणे घेणे नाही.
संबंधित आघाडीचे माजी नगरसेवक ते आणि त्यांचे ठेकेदार आणि त्यांची टक्केवारी यातच सध्या ते मश्गूल आहेत. भुयारी गटार योजनेसाठी एकाच ठिकाणी सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया केंद्र उभे करावयाचे होते. मात्र, सत्ताधाऱ्यांना जागा मिळू न शकल्याने आता प्रत्येक विभागांमध्ये एक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणार आहे.
उदयनराजेंची घेतली फिरकी...
राज्यपालांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की मी मागेच सांगितले होते. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वेळी भूमिका घेतील. सगळ्या महाराष्ट्रातील जनतेच्या भावना जाणणारा हा नेता आहे. राज्यपाल बदलण्यासाठी प्रक्रिया असते. शिपाई बदलायचा म्हटले, तर एका दिवसात होत नाही.
हा तर राज्यपालांचा विषय होता. उदयनराजे दिल्लीत मोदींना भेटले त्या वेळी त्यांचेच वक्तव्य होते. त्यांनी लढा केला तर लढाई आज आणि दोन महिन्यांनंतर यश आले. ज्याने त्याने उठायचे आणि माझ्यामुळे झाले म्हणत क्रेडीट घ्यायचे, अशा शब्दात त्यांनी उदयनराजेंची फिरकी घेतली.
अजिंक्यतारा किल्ल्याचा शंभर कोटींचा आराखडा
अजिंक्यतारा किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचा शंभर कोटींचा आराखडा नगरविकास विभागाला सादर केला आहे. येथे विविध विकासकामे, तसेच छत्रपती शाहू महाराजांची माहिती देणारे दालन, ऐतिहासिक इमारतीची डागडुजी करण्यासंदर्भात नियोजन आहे, तसेच लवकरच अजिंक्यतारा रस्त्याचे टेंडर काढले जाणार असून, याकरिता निधी मंजूर झाला आहे. सातारा पालिकेने लवकरात लवकर या विषयाची निविदा काढावी, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.