esakal | satara | दुचाकीवर फिरावे लागले नसते शिवेंद्रसिंहराजे यांची उदयनराजेंवर नाव न घेता टीका
sakal

बोलून बातमी शोधा

शिवेंद्रसिंहराजे भोसले

दुचाकीवर फिरावे लागले नसते शिवेंद्रसिंहराजे यांची उदयनराजेंवर नाव न घेता टीका

sakal_logo
By
प्रशांत पाटील

सातारा : शहरात विविध कामांच्‍या प्रारंभाची पोस्‍टरबाजी सुरू आहे. पोस्‍टरबाजीचा खर्च पालिकेतून केला असेल, तर त्‍या खर्चातून एखादे छोटेमोठे विकासकाम पूर्ण झाले असते. कोणतरी दुचाकीवरून फिरल्‍याचेही माझ्‍या वाचनात आले. पाच वर्षे पालिकेची सत्ता तुमच्‍या ताब्‍यात आहे. या पाच वर्षांत सातारकरांची कामे केली असती, तर दुचाकीवर फिरायची वेळ आली नसती, अशी टीका आज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंवर नाव न घेता पत्रकार परिषदेत केली.

शिवेंद्रसिंहराजे म्‍हणाले, ‘‘सगळी नौटंकी सुरू आहे. हातातील संधी निघून गेल्‍याचे त्‍यांच्‍या लक्षात आले असून, आगामी काळात पब्‍लिकच त्‍यांच्‍या नौटंकीवर पडदा टाकणार आहे. पाच वर्षे सत्ता असतानाही त्‍यांना साताऱ्याच्‍या विकास करता आलेला नसून त्‍यांनी कामांच्‍या माध्‍यमातून सातारकरांची स्वप्नपूर्ती करणे आवश्‍‍यक होते. पालिकेला भ्रष्‍टाचाराचा अड्डा बनवत सत्ताधाऱ्यांनी अंदाधुंद कारभार केला आहे. याविरोधात आमचे नगरसेवक आवाज उठवत असले, तरी बहुमताच्‍या जोरावर तो आवाज दाबण्‍यात येत आहे.

हेही वाचा: "येत्या काळात महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करुन सोडणार"

कोविडच्‍या नावाखाली सर्वसाधारण सभा न घेता भ्रष्‍टाचार दडपण्‍याचा प्रयत्‍न सत्ताधारी करत आहेत.’’ सत्ताधाऱ्यांनी राबविलेल्‍या प्रत्‍येक उपक्रमात भ्रष्‍टाचार असून, निवडणुकांच्या तोंडावर कामे न करता बिले काढण्‍याची त्‍यांची तयारी सुरू असल्‍याचा आरोपही त्‍यांनी या वेळी केला.

आमचे नगरसेवक कमी असूनही त्‍यांनी सातारकरांच्‍या विकासाला चालना देणारे उपक्रम राबविण्‍यावर भर दिला आहे. काम झाले तर माझ्‍यामुळे आणि नाही झाले तर ते दुसऱ्यामुळे हा सत्ताधारी आघाडीच्‍या नेत्‍यांचा पायंडा आहे. दुसऱ्याच्‍या कामांचे श्रेय लाटणाऱ्या सत्ताधारी आघाडीच्‍या नेत्‍यांना सातारकरांशी काहीही देणेघेणे नसल्‍याचे दिसून येत आहे. आपण कोणते प्रकल्‍प राबवतो, त्‍याचा सातारकरांना काय फायदा होतोय, याचे भान देखील त्‍यांना नाही. ग्रेड सेपरेटरचा सातारकरांना किती फायदा झाला, त्‍याचा वापर किती जण करतात, हे तपासणे गरजेचे आहे. त्‍या ग्रेड सेपरेटरच्‍या फलकावरील संकल्‍पक म्‍हणून एक नाव होते. ग्रेड सेपरेटरचा वापर दिवसेंदिवस कमी होत असून, आगामी काळात त्‍याला प्रेक्षणीयस्‍थळाचा दर्जा द्यावा लागेल. त्‍यामुळे का होईना, बाहेरचे पर्यटक येतील व त्‍याचा वापर करतील, अशी कोपरखळीही त्‍यांनी उदयनराजे यांना मारली.

loading image
go to top