esakal | जळालेल्या ‘शिवशाही’चा इतर बस ना अडथळा
sakal

बोलून बातमी शोधा

जळालेल्या ‘शिवशाही’चा इतर बस ना अडथळा

स्थानकातून बस हटविण्याबाबत एसटी प्रशासनाने वारंवार पत्रव्यवहार करूनही संबंधित कंपनीने पत्रांना केराची टोपली दाखविली आहे.

जळालेल्या ‘शिवशाही’चा इतर बस ना अडथळा

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा: येथील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये मागील सात महिन्यांपूर्वी आगीच्या दुर्घटनेत चार शिवशाही बस खाक झाल्या होत्या. मात्र, या घटनेला कित्येक महिने उलटूनही स्थानकात अद्यापही एक शिवशाही उभी असल्याने ती इतर बसला अडथळा ठरत आहे. स्थानकातून बस हटविण्याबाबत एसटी प्रशासनाने वारंवार पत्रव्यवहार करूनही संबंधित कंपनीने पत्रांना केराची टोपली दाखविली आहे.

हेही वाचा: नवी मुंबई ते सातारा,जावळी प्रवासी भाडे ५०० ते ६०० रुपये; बसचालकांकडून लूट

सातारा आगारात गेल्या सात महिन्यांपूर्वी एक शिवशाही पेटल्यामुळे लगतच्या तीन बसही आगीमध्ये जळाल्या होत्या. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. दुर्घटनेनंतर महिनाभरात तीन शिवशाही दुरुस्त करून संचलनात आणल्या आहेत. मात्र, एक शिवशाही अद्यापही मध्यवर्ती ठिकाणी उभी आहे. बस स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच, बाहेरून आगारात प्रवेश करताना इतर बसला दुर्घटनेतील बस अडथळा ठरत आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी बस स्थानकात एक बस मागे घेताना शिवशाहीला ठोकरल्याची घटना घडली होती. त्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी तत्काळ बस हलविण्याची मागणी केली होती. मात्र, अद्यापही बस न हलविल्याने मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत.

हेही वाचा: सातारा जिल्ह्यात 111 कामांसाठी 8.33 कोटी निधी मंजूर

दुर्घटनेतील शिवशाही बस स्थानकातून नेण्यासाठी एसटी प्रशासनाने वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र, संबंधित कंपनी बस हलविण्यास तयार नाही. त्यामुळे, एसटी प्रशासनाने कंत्राटी कंपनीसमोर गुडघे टेकल्याचे दिसून येत आहे. एसटी प्रशासनाने कडक भूमिका घेऊन कंपनीला ताळ्यावर आणण्यासाठी कारवाई करण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, प्रशासनाकडून केवळ पत्रव्यवहार केला जात असल्याचे दिसून येत आहे. बस स्थानकात एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर एसटी प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्‍न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा: सातारा: जनावरं चारण्‍यास मनाई केल्याने वनमजुरास मारहाण

‘‘दुर्घटनेतील शिवशाही बस भगीरथ कंपनीची असून, स्थानकातील बस हलविण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला जात आहे. मात्र, कंपनीकडून बस नेण्याबाबत कोणतेही उत्तर दिले जात नाही.’’

- रेश्‍मा गाडेकर, आगारप्रमुख (कनिष्ठ), सातारा

loading image
go to top