धक्कादायक! कोव्हिड सेंटरमध्ये जागा आणि व्हेंटिलेटर नसल्याने 72 वर्षीय निवृत्त नायब तहसीलदारांचा मृत्यू

सचिन शिंदे | Tuesday, 11 August 2020

शहरात कोविडचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे शहरातील रूग्णालये हाऊस फुल्ल आहेत. कोविडचा त्रास होणाऱ्यांना येथे जागाच शिल्लक नसल्याने बेड व व्हेंटिलेटर वाढविण्याची मागणी नागरीक, लोकप्रतिनिधी करत आहेत.

कऱ्हाड : उपलब्ध कोविड हॉस्पीटलससह अन्य हॉस्पीटलमध्ये केवळ व्हेंटिलेटर न मिळाल्याने शहरातील सातव्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यची घटना रात्री सातारा जिल्ह्यात घडली.  अवघ्या आठवडाभरापूर्वीच एका व्यापाऱ्याचाही व्हेंटिलेटर न मिळाल्याने दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसातच याच कारणाने निवृत्त नायब तहसीलदांराचा मृत्यू झाल्याने नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे. महिनाभरात सात ज्येष्ठ नागरिकांना केवळ व्हेंटिलेटर नसल्याने मृत्यूला कवटाळावे लागल्याने कऱ्हाडात चितेंचे वातावरण पसरले आहे.
कोरोनाचा हॉरर शो  

सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रविवारी एक महत्वाची बैठक कऱ्हाड येथे झाली. त्यावेळी सातारा जिल्ह्यातील काेराेना सेंटरच्या दुरावस्थेबद्दल लाेकप्रतिनिधींनी चिंता व्यक्त केली हाेती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्वरित अशा संदर्भात कारवाईचे आदेश दिले आहेत. तरीही जिल्ह्यात विशेषतः कराड तालुक्यात वाढती रुग्णसंख्येचा विचार करुन तातडीने आवश्यक त्या उपाययाेजना आखल्या गेल्या नाहीत असा सूर कऱ्हाडमधील शनिवार पेठेतील नागरिकांमधून उमटत आहे.

अपंगत्वावर केली मात, त्या कर्तबगाराला उदयनराजेंची साथ!

येथील शनिवार पेठेत ही घटना घडली. निवृत्त नायब तहसीलदारांना तीन दिवसांपासून त्रास होत होता. त्यांच्यावर उपचारही सुरू होता. रविवारी रात्री त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने नातेवाईकांनी त्यांना त्वरीत रूग्णालयात हलवले. शहरातील तिन्ही कोविड रूग्णलायत नेण्यात आले. तिन्ही रुग्णालयांमध्ये बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने प्रवेश मिळू शकला नाही. त्यानंतर तब्बल तीन तास नातेवाईक संबंधित रुगणासह शहरातील विविध रुग्णलयांमध्ये फिरत होते. एकाही रूग्णालयात त्यांना व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ शकला नाही. त्यानंतर संबधितांस त्यांच्या खासगी वाहनातून सातारा येथील एका खासगी रूग्णालयात आणले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. त्यांची कोरोनाची टेस्ट घेण्यात आली होती. आज (मंगळवार) सकाळी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान संबंधित नायब तहसीलादारांना कऱ्हाडमध्येच व्हेंटिलेटर किंवा बेड उपलब्ध झाला असता तर त्यांचा जीवही वाचला असता अशी भावना शनिवार पेठेतील रहिवाशांनी व्यक्त केली. 

कोरोना उपचारासाठी कागदपत्रे बरोबर ठेवा, हे आरोग्यमित्र तुम्हाला करतील मदत

कऱ्हाडात व्हेंटिलेटरचा तुटवडा, व्यापाऱ्याचा मृत्यू; नागरिक प्रशासनास जाब विचारणार

शहरात कोविडचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे शहरातील रूग्णालये हाऊस फुल्ल आहेत. कोविडचा त्रास होणाऱ्यांना येथे जागाच शिल्लक नसल्याने बेड व व्हेंटिलेटर वाढविण्याची मागणी नागरीक, लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा काल पुर्ननुभव आला. यापूर्वी सहा ज्येष्ठ नागरिकांनाही याच कारणाने आपला जीव गमवावा लागला आहे.

Edited By : Siddharth Latkar