esakal | भाविकांच्या गैरहजेरीत म्हसवडला सिध्दनाथ जोगेश्वरीचा विवाह सोहळा थाटात
sakal

बोलून बातमी शोधा

भाविकांच्या गैरहजेरीत म्हसवडला सिध्दनाथ जोगेश्वरीचा विवाह सोहळा थाटात

कोरोनाच्या साथीमुळे मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत व भाविकांच्या गैरहजेरीत हा विवाह शासनाच्या आदेशाचे निर्देशाचे उल्लंघन न करता पार पाडला.

भाविकांच्या गैरहजेरीत म्हसवडला सिध्दनाथ जोगेश्वरीचा विवाह सोहळा थाटात

sakal_logo
By
सलाउद्दीन चाेपदार

म्हसवड (जि. सातारा) : भाविकांचे कुलदैवत व श्रध्दास्थान असलेले येथील श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानचा पारंपरिक शाही विवाह सोहळा कोरोनाच्या साथीमुळे भाविकांच्या गैरहजेरीत मंदीराचे सालकरी व मोजक्याच पुरोहित व पुजारी यांच्या उपस्थितीत मंत्रघोषात व मंगलअष्टकांच्या सुरात संपन्न झाला.

दिपावली पाडवा ते देवदिपावली दरम्यानच्या एक महिन्याच्या कालावधीचा या देवस्थानचा शाही विवाह सोहळा महिनाभरात विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. दिपावली पाडव्यास श्रींची घटस्थापना भाऊबीजेस हळदीचा समारंभ व 12 रात्रीचे उपवास व भाविकांच्या नगरप्रदक्षणेचा प्रारंभ त्यानंतर दिवाळी मैदान व तुलसी विवाह दिवशी 12 नवरात्रीच्या उपवासाची सांगता करुन रात्री बारा वाजता श्रींचा विवाह सोहळा असे क्रमवार मंदीरात कार्यक्रम पारंपरिक पध्दतीने संपन्न होत असतात. या शाही विवाह सोहळ्याची सांगता देवदिपावलीस वधू-वराची रथातून वरात काढून केली जाते.

गुरुवारी रात्री बारा वाजता वर श्री सिध्दनाथ व वधू देवी जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा भाविकांच्या गैरहजेरीत संपन्न झाला. कोरोनाच्या साथीमुळे या विवाह सोहळ्यास भाविकांच्या उपस्थितीसह मंदीरातील श्रींच्या दर्शनासाठीही शासनाने प्रतिबंध आदेश जारी केल्यामुळे दिवसरात्र मंदीराचे चारी दिशेतील प्रमुख प्रवेशद्वार पोलिस बंदोबस्तात कुलुप बंद ठेवण्यात आले होते.

राज्यात कॉंग्रेसला गृहीत धरले जाते, ही चर्चा खरी नाही : पृथ्वीराज चव्हाण
 
या शाही विवाह सोहळ्यानिमित्त मंदीर परिसर दर्शनबारी व शिखरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या विवाह सोहळ्यानिमित्त सायंकाळी श्री सिध्दनाथ देवस्थानची उत्सव मूर्ती मंदीरासमोरील मंडपातील अखंड काळ्या पाषाणाच्या हत्तीच्या शिल्पावरील अंबारीत स्थानापन्न करण्यात आली व त्यानंतर विवाहाच्या मुहूर्ताच्या समयी सालकरी यांनी अंबारीतील मुर्ती मंदीराच्या मुख्य गाभा-यात घेऊन जाताच उपस्थित पुरोहित,पुजारी यांनी मंत्रघोषात मंगलअष्टकांच्या सुरात हा विवाह संपन्न केला. कोरोनाच्या साथीमुळे मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत व भाविकांच्या गैरहजेरीत हा विवाह शासनाच्या आदेशाचे निर्देशाचे उल्लंघन न करता पार पाडला.

Edited By : Siddharth Latkar

loading image