
Soybean : भाववाढीअभावी सोयाबीन उत्पादक अडचणीत
काशीळ : जिल्ह्यात खरीप हंगामातील सोयाबीन हे प्रमुख पीक झाले आहे. सोयाबीनचे दर वाढतील असा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन शिल्लक ठेवले आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून दरात कोणतीही सुधारणा न होता प्रतिक्विंटल ५४०० ते ५५०० या दरम्यान स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
जिल्ह्यात ८० हजार हेक्टर सोयाबीनचे पीक घेतले जाते. खरीप हंगामातील ते प्रमुख पीक झाले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन होत असल्याने सोयाबीन उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी या काळात सोयाबीन सात ते दहा हजार रुपये क्विंटलभर गेले होते. सोयाबीनला मिळालेला समाधानकारक दरामुळे या खरिपात सोयाबीनच्या क्षेत्रातही वाढ झाली होती.
सोयाबीन काढणी झाल्यावर त्याची विक्री न करता शेतकऱ्यांकडून सोयाबीनची साठवणूक केली. ऑक्टोबर, नोव्हेंबर दरम्यान सोयाबीन सहा हजार रुपये क्विंटलवर गेले होते. त्यामुळे पुढील काळात सोयाबीन दरात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात असल्याने सोयाबीन साठवणूक करण्यावर शेतकऱ्यांचा कल वाढला.
दरम्यान, डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या दरात घसरण होण्यास सुरुवात झाली. जानेवारीच्या सुरुवातीस सोयाबीन दर साडेपाच हजार रुपये क्विंटलवर आले. अजूनही हे दर स्थिर आहेत. दोन महिन्यांपासून सोयाबीन प्रतिक्विंटल ५४०० ते ५५०० रुपयांवर स्थिर आहेत.
दोन महिन्यांपासून दरात कोणतीही वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. दर चांगला मिळेल, या अंदाजावर शेतकऱ्यांकडून बियाण्यांचे दर काही न पाहता बियाणे खरेदी केली होती. मात्र, दर बियाण्याच्या दराच्या निम्यावर राहिले आहेत.
शेतकरी द्विधा मनःस्थितीत
खरीप हंगाम जवळ येईल तसे सोयाबीनच्या दरात वाढ होण्याचा व्होरा शेतकऱ्यांच्या असतो. मात्र, दोन महिन्यांपासून वाढ न होता घसरण होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे सोयाबीन ठेवावे, की विकावे अशा द्विधा मनःस्थितीत शेतकरी सापडले आहे.
मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी समाधानकारक दर मिळतील, यासाठी शेतकऱ्यांकडून सोयाबीन साठवणूक केली आहे. मात्र, दरातील कसलीच हालचाल होत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची भीती निर्माण झाली आहे.
सोयाबीन - दर (क्विंटल)
नोव्हेंबर - ६१०० ते ६२००
डिसेंबर - ५८०० ते ५९००
जानेवारी - ५५०० ते ५७००
फेब्रुवारी - ५५०० ते ५६००
मार्च - ५४०० ते ५५००