पेरणीनंतर सोयाबीनच उगवले नाही; उत्पादक कंपन्यांवर गुन्हे : मुकुंद म्हेत्रे

केशव कचरे
Thursday, 24 September 2020

सोयाबीन बियाणे तयार करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल झाल्याने पुढील वर्षी सोयाबीन बियाणाचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या बियाणे न देण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे पुढील वर्षीच्या खरिपावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून कृषी विभागाने आत्तापासूनच तयारी सुरू केली असल्याचे कृषी पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे यांनी सांगितले.

बुध (जि. सातारा) : यंदा मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन पेरणीमध्ये मोठी वाढ झाली. मात्र, पेरणीनंतर सोयाबीन उगवले नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या. काही बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हेही दाखल झाले. हा सगळा सावळागोंधळ सोयाबीनच्या बाबतीत घडला आहे. त्यामुळे पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांनी घरीच सोयाबीन बियाणे तयार करावे, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे यांनी केले. 

नवलेवाडी (ता. खटाव) येथे कृषी विभागातर्फे आयोजित सोयाबीन शेतीशाळेत सोयाबीन पेरणीपूर्व व काढणीपश्‍चात घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन करताना श्री. म्हेत्रे बोलत होते. याप्रसंगी मंडल कृषी अधिकारी सचिन लोंढे, कृषी पर्यवेक्षक नामदेव कोळेकर, सरपंच शहाजी निकम, दीपक पवार, नितीन शिंदे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. 

Video : पर्यटकांच्या ओढीने पाचगणी पुन्हा बहरले

म्हेत्रे म्हणाले, "सोयाबीन बियाणे तयार करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल झाल्याने पुढील वर्षी सोयाबीन बियाणाचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या बियाणे न देण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे पुढील वर्षीच्या खरिपावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून कृषी विभागाने आत्तापासूनच तयारी सुरू केली असून, यावर "ग्रामबिजोत्पादन' अर्थात घरच्या घरी बियाणे तयार करणे हा चांगला पर्याय निर्माण झाला आहे.'' सचिन लोंढे यांच्या हस्ते ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझर व आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. मंडल कृषी अधिकारी सचिन लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नवलेवाडीत सोयाबीन शेतीशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे कोळेकर यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soybean Farming Workshop By Agriculture Department At Navlewadi Satara News