esakal | Satara : सोयाबीनचे भाव गडगडले
sakal

बोलून बातमी शोधा

soybean

Satara : सोयाबीनचे भाव गडगडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : खरीप हंगामातील नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे दर सध्या अचानक घसरले आहेत. आठवडाभरात ६५ रुपयांवरून ५८ रुपये किलोवर दर आल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. सोयाबीनचा हमीभाव ४० रुपये असल्याने पणन विभाग व जिल्हा उपनिबंधकांकडून यासंदर्भात कोणतीच भूमिका घेतली जात नाही. इंधनाचे दर दररोज वाढत असताना शेतकऱ्यांच्या मालाचे भाव मात्र, दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर निघू लागला आहे.

कोरोनामुळे गेल्यावर्षी शेतीच्या उत्पन्नाला फारसा भाव मिळालेला नाही. जिल्ह्यातील नगदी पीक असलेल्या आले पिकालाही सात हजारांच्या आतच भाव राहिला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीतच राहिला आहे. आता खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी सुरू आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या सोयाबीनला चांगला दर असल्याने तातडीने बाजार दाखवला. सुरवातीला ७० ते ८० रुपयांपर्यंत दर राहिला. पण, व्यापाऱ्यांना सोयाबीन घालताना ओलावा असल्याने पोत्यामागे दहा ते २५ किलोपर्यंत तूट निघाली. परिणामी हा तोटा सहन करूनही चांगला दर मिळाल्याचे शेतकऱ्यांत समाधान होते. पण, गेल्या आठवड्यात ६५ रुपये दर असलेले सोयाबीन आता ५८ रुपयांवर आलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. नेमका दर कमी होण्याच्‍या कारणांचा शोध शेतकरी घेऊ लागला आहे.

सोयाबीनचा परदेशात जनावरांचे खाद्य म्हणून वापर केला जातो. सोयाबीनचे तेल तसेच जनावरांचे खाद्य आणि पोल्ट्रीचे खाद्यही बनविले जाते. सध्या खाद्यतेलाचे भाव तेजीत आहेत. पोल्ट्रीतील कोंबड्यांना सोयाबीनपासून बनविलेले खाद्य दिल्यास अंड्यांचा आकार वाढतो, त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना फायद्याचा आहे. सध्या कोरोनामुळे अंड्यांना मागणी असून, प्रोटीनयुक्त खाद्याला मागणी वाढली आहे. सोयाबीन निर्यात होत असल्याने आपल्याकडचे भाव वाढलेले होते. भाव वाढलेले असल्याने सोयाबीनच्या निर्यातीवर सप्टेंबरमध्ये बंदी करण्यात आली. परिणामी आता दर खाली येऊ लागले आहेत. सोयाबीनच्या काढणीनंतर भाव कमी-जास्त होतात. पण, यावेळेस भाव वेगाने कमी झाल्याने शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर निघू लागला आहे. सुरवातीला सोयाबीनचे दर १०० रुपये किलोपर्यंत होते. पण, आता ५८ रुपयांवर आलेले आहेत.

काही शेतकरी सोयाबीन वाळवून जादा दर आल्यावर विक्री करतात. पण, कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीनचे पैसे करून आपली आर्थिक गरज भागवायची असल्याने आता बहुतांशी शेतकरी सोयाबीनची मिळेल त्या भावाने विक्री करू लागला आहे. पण, व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या या अतिघाईचा फायदा उठविला जात आहे. मुळात पणन मंडळ, बाजार समिती आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे या सर्वांवर नियंत्रण असले तरी हमीभावापेक्षा जास्त दर असल्याने त्यांना व्यापाऱ्यांवर कारवाई करता येत नाही.

"सध्या सोयाबीनचे दर कृत्रिमरित्या पाडले आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या विक्रीची गडबड करू नये. निसर्गामुळे शेतकरी अडचणीत आलेले असून, त्यातच सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने सोयाबीनची विक्री करून तोट्यात जाण्यापेक्षा सोयाबीन ठेवावे."

- अनंत माने, शेतकरी, रहिमतपूर

"१५ दिवसांपूर्वी ७० ते ८० रुपये किलोप्रमाणे सोयाबीनचे दर होते. पण, अचानक हे खाली येऊन आता ५८ रुपयांवर आले आहेत. ही शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक सुरू असून, बाजार समिती व पणन विभाग झोपेचे सोंग घेऊन बसले आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बाजार समितीपुढे उपोषण करणार आहे."

-प्रकाश साबळे, युवक जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती संघटना, सातारा

loading image
go to top