
तरीही कचरा रस्त्यावरच; साताऱ्यातील चित्र
सातारा : स्वच्छ सर्वेक्षणात सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करणाऱ्या सातारा पालिकेने शहरातील कचऱ्याचे संकलन आणि वर्गवारी करण्यासाठीची उभारलेली यंत्रणा गेले काही दिवस अविरत कार्यरत आहे. शहरातील कचऱ्याचे संकलन करण्यासाठी दिवस-रात्र घंटागाड्या धावत असतानाही काही सातारकर घर, दुकानातील कचरा रस्त्यावर फेकण्यात धन्यता मानत असून, अशी कचराफेक करणाऱ्यांवर सातारा पालिकेने कारवाई करणे गरजेचे आहे.
हेही वाचा: चीनचे पाऊल इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्राच्या दिशेने
सातारा शहरासह उपनगरांतील कचऱ्याचे संकलन सातारा पालिका करत असून त्यासाठी स्वतंत्र ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठेकेदाराच्या अखत्यारित असणाऱ्या घंटागाड्या घरोघरी जाऊन कचऱ्याचे संकलन करत असून, नंतर त्याचे विघटन, वर्गवारी सोनगाव येथील कचरा डेपोत स्वतंत्र यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे. मध्यंतरीच्या काळात कचरा संकलन, विघटनाच्या कामात शिथिलता आली होती. यामुळे पालिकेने संबंधित ठेकेदारास खडसावत कचरा संकलनाचे सुधारित वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाने केल्या होत्या. यानुसार सध्या सातारा शहर आणि परिसरात दिवस-रात्र घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलन होत आहे.
विविध प्रभागांतील कचरा गोळा करण्याचे काम गेले काही दिवस दोन पाळ्यांमध्ये सुरू असले तरी साताऱ्यातील अनेक नागरिक आणि व्यापारी जमा झालेला कचरा रस्त्याच्याकडेला फेकण्यातच धन्यता मानत आहेत. बेशिस्त, बेफिकिर नागरिकांमुळे शहरातील आरोग्य धोक्यात आले असून, शहराच्या विविध भागात कचऱ्याचे ढीग दररोज जमा होत आहेत. या कचऱ्याच्या ढिगाजवळ भटकी कुत्री ठाण मांडून बसत असून, त्यांच्याकडून नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटनाही अनेक वेळा घडत आहेत.
हेही वाचा: सोलापूर जिल्ह्यात आढळले आठ नवे रुग्ण
घंटागाडी परिसरातून निघून गेल्यानंतर रस्त्याच्या कडेला फेकण्यात आलेला ढीग नंतरच्या काळात पालिकेचा आरोग्य विभाग हटवत असला तरी त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न कायम राहात आहे. पालिकेने अशा प्रकारे उघड्यावर कचरा जमा होणाऱ्या ठिकाणाचा सर्वे करत त्याठिकाणी कचरा फेकणाऱ्या नागरिकांची माहिती गोपनीय पध्दतीने जमा करत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.
शहराच्या सौंदर्यात होईल वाढ
दरम्यान, पालिकेने पुढाकार घेत उघड्यावर कचराफेक करणाऱ्यांवर कारवाई केल्यास बेशिस्त आणि बेफिकीर नागरिकांना जरब बसून सातारा शहराच्या सौंदर्यात वाढ होण्यास मदत होईल.
Web Title: Still On The Garbage Road Pictures From Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..