Satara News : दागीने मोडून मुलाला केला पीएसआय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara News : दागीने मोडून मुलाला केला पीएसआय

Satara News : दागीने मोडून मुलाला केला पीएसआय

कऱ्हाड : पोटच्या मुलाला घडवण्यासाठी आई मोठे कष्ट घेते. तिची माया-प्रेम आणि कष्ट याची जाणीव ठेवुन अनेक तरुण उच्चपदस्थ झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याचे एक जीवंत उदाहरण आहे कऱ्हाड (जि.सातारा) तालुक्यातील गोटेवाडीतील संगीता कृष्णा आमले यांचे.

आपला मुलगा पंकज याने अधिकारी व्हावे यासाठी त्या माऊलीने त्याच्या अभ्यासाठीच्या पुस्तकासाठी, शैक्षणिक खर्चासाठी दागिने मोडले, प्रसंगी मोल-मजुरीही केली. त्याची जाण ठेवुन पंकजनेही दिवसरात्र एक करत अभ्यास करुन केंद्रीय पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षकपदी मजल मारली.

आईने वडीलांच्या सहकार्याने केलेल्या प्रचंड कष्टातुन पंकजने पोलिस उपनिरीक्षपदी मजल मारली. पंकजची आई संगीता आमले यांनी मुलाला अधिकारी करण्याचे स्वप्न सत्यात उतरुवुन अन्य सावित्रीच्या लेकींसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

कऱ्हाड तालुक्यातील गोटेवाडीतील आमले या कुटुबियांच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य. पण नशिबाला पोरं चांगली. पंकज आणि त्याची बहिण प्राजक्ता हुशार होती. पंकजने पाचवीपासून वर्गातील प्रथम क्रमांक सोडला नाही.

घरची परिस्थीती बिकट होती. त्यामुळे वडिलांनी कामासाठी मुंबई गाठली. त्यामुळे कुटुंबाचा सगळा भार संगीताताईंनी मोठ्या कष्टाने पेलला. त्यांनी पै-पै जमा करुन मुलाला चांगले शिक्षण देण्याचा मानस ठेवला होता. मात्र तरीही त्यांना आर्थिक अडचण सतावतच होती. दरम्यानच्या काळात पंकजचे वडील गावी आले.

त्यानंतर त्यांनी कामासाठी कऱ्हाड गाठले. दरम्यानच्या काळात आई-वडीलांच्या सल्यानुसार पंकजने वेणुताई चव्हाण कॉलेजला बीएला प्रवेश घेऊन पदवी पुर्ण केली. त्यानंतर त्याने वर्कशॉप मध्ये हेल्पर म्हणून काम केले. त्यानंतर कुरियरमध्येही काम केले. त्यादरम्यान त्याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातुन बीकॉम केले.

पैशाअभावी त्याला इंजिनीअरिंगला प्रवेश घेता आली नाही. त्यानंतर त्याने खाकी वर्दीत जाण्याचे स्वप्न मनी घेवुन वाटचाल सुरु केली. त्यासाठी पंकजने केंद्रीय पोलिस दलात भरती होण्याचे ठरवले. घरची परिस्थिती हलाखीची असताना मुलाने शिकून मोठं व्हावे, अधिकारी होऊन नाव कमवावं यासाठी आई-वडिलांनी मोठे कष्ट घेतले.

त्यानंतर देखील शिक्षणाचा खर्च भागत नसल्याने आईने घर काम केले, प्रसंगी मेसमध्ये जावुन काम केले. वडिलांनी मजुरी-सेंट्रींगचे काम केले. तरिही शिक्षणाचा खर्च भागत नसल्याने आईने मुलाच्या शिक्षणासाठी, त्याच्या अभ्यासासाठीच्या पुस्तकासाठी, शैक्षणिक फी भरण्यासाठी दागीने मोडण्याचा निर्णय घेतला.

घरामध्ये तो निर्णय रुचला नाही. मात्र आईला मुलांला शिक्षण देवुन मोठा अधिकारी करण्याचे स्वप्न सत्यात उतरवायचे होते. त्यासाठी आईने धाडसाने दागीने मोडले आणि पंकजला शिक्षणासाठी पैसे दिले. पंकजलाही त्यादिवशी खुपच वाईट वाटले. आई वडील आपल्यासाठी जीवाचे रान करत असल्याचे पाहून पंकजने दिवस रात्र अभ्यास केला.

त्या दरम्यान आलेल्या कोरोनामुळे ही भरतीच दोन वर्षे झाली नाही. त्यादरम्यान पंकजने तीन वर्षे एमआर म्हणून काम करून घरच्यांना आर्थिक हातभार लावला. यावेळी स्टाफ सिलेक्शन कमीशनकडून घेण्यात आलेल्या केंद्रीय पोलिस दलाची त्याने परिक्षा दिली. जुलै २०२१ मध्ये मुख्य परीक्षेला जाताना प्रचंड पावसामुळे गाड्या बंद होत्या.

त्यामुळे पंकजसमोर मुंबई गाठायची मोठी अडचण होती. त्यासाठी चार किलोमीटर गुडघाभर पाण्यातून चालत जाऊन मालवाहतुकीच्या ट्रकमधुन पंकजने वडिलासमवेत मुंबई गाठली. त्यामध्ये त्याने जिद्दीने आगाशीव डोंगरावर सात महिने सराव करुन १६०० मीटर रनींगमध्ये पहिला क्रमांक पटकावला. त्यामुळे त्याचा लेखी परिक्षेसाठीचा आत्मविश्वासही दुणावला.

या परिक्षेसाठी देशातुन आठ लाखांवर तरुण बसले होते. त्यात पहिल्याच प्रयत्नात सीआयएसएफमध्ये सेंट्रल पोलीस उपनिरीक्षकपदाची परिक्षा पंकज पास झाला. देशातुन आठ लाख तरुणापैकी सीआयएसएफमध्ये केवळ ६२३ तरुणांची निवड झाली. त्यामध्ये पंकजने देशाच्या गुणवत्ता यादीत बाजी मारुन आईने त्याला केलेल्या कष्टाचे पांग फेडले.

रात्रंदिवस अभ्यास करून पंकजने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक या पदाला गवसणी घातली. त्यातुन पंकजची आई संगीता आमले यांनी मुलाला अधिकारी करण्याचे स्वप्न सत्यात उतरुवुन अन्य सावित्रीच्या लेकींसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी पहिल्यापासुन कष्ट केले. वेळ आली तेव्हा दागीने विकल मात्र त्याला शिक्षणासाठी पैसे कमी पडू दिले नाहीत. माझ्या कष्टाची जाण ठेवुन अभ्यास करुन पंकजनेही पोलिस उपनिरीक्षपदी मजल मारली ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.

- संगीता आमले

टॅग्स :SatarapolicePSI