esakal | शिक्षकांनी जागविल्या सुमित्राताईंच्या आठवणी

बोलून बातमी शोधा

sumitra bhave
शिक्षकांनी जागविल्या सुमित्राताईंच्या आठवणी
sakal_logo
By
सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : तीन आंतरराष्ट्रीय, दहा राष्ट्रीय अन् 40 हून अधिक राज्य पुरस्कार पटकाविणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे साेमवारी पुण्यात निधन झाले. सातारा तालुक्यातील कुमठे विभागाशी त्यांचा स्नेह होता. काही काळ त्यांचे इथे वास्तव्यही होते. त्यानिमित्ताने या परिसरातील शिक्षकांनी त्यांच्या आठवणी जागविल्या.

सुमित्रा भावे या प्रगल्भ, प्रयोगशील दिग्दर्शिका म्हणून प्रसिद्ध होत्या. सन 2014 च्या सुमारास त्यांचा जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राशी जवळून संबंध आला. विशेषतः सातारा तालुक्यातील कुमठे विभागात प्रसिद्धी पावलेला ज्ञानरचनावाद समजून घेण्यासाठी त्यांचा इथे संपर्क होता. परिसरात आठवडाभर वास्तव्य होते. कारी, आरे तर्फ परळी, दरे तर्फ परळी येथील शाळांत सुरु असलेले रचनावादी शिक्षण त्यांनी अत्यंत तन्मयतेने अभ्यासले. त्यांचे सहकारी दिग्दर्शक सुनील सुकथनकर, अभिनेत्री ज्योती सुभाष यांच्यासोबत त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेचा सूक्ष्मपणे अभ्यास केला. विभागाच्या तत्कालीन विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे तसेच वनिता निंबाळकर, रचना पवार, अबजल काझी, सुषमा होनराव, उमा पाटील, रवींद्र वाघमारे, तानाजी सराटे, भरत सावंत, सुजाता गायकवाड आदी शिक्षकांशी त्या गप्पा मारत.

रचनावादाचे विविधांगी पैलू जाणून घेत. पुढे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने (एमकेसीएल) त्यावर 'माझी शाळा' या मालिकेची निर्मितीही केली. त्याचे दिग्दर्शन सुमित्रा भावे- सुनील सुकथनकर या द्वयींनी केले. त्यातील भागांत उषा गोरे, माया मोहिते तसेच काही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करण्याची संधीही लाभली. सुमित्राताईच्या निधनानंतर या साऱ्या आठवणी विभागातील शिक्षकांनी जागविल्या.

"सुमित्राताईंकडे असणारा विलक्षण साधेपणा लक्षात राहणारा होता. त्या निगर्वी होत्या. कुठलीही ऐट, बडेजाव त्यांच्या ठायी नव्हता. त्या शांतपणे सारे समजून घेत. कायम विद्यार्थ्याच्या भूमिकेतून प्रत्येक गोष्ट जाणून घेत."

प्रतिभा भराडे, तत्कालीन विस्तार अधिकारी, कुमठे (ता. सातारा) विभाग

ऊस संशोधकाची मनाला चटका लावणारी एक्झिट

सातारकरांनाे! पालिकेने सुरक्षिततेसाठी घेतला तातडीने निर्णय