दूध दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; शेतकरी रस्त्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दूध दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; शेतकरी रस्त्यावर

केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउन जाहीर केल्यामुळे हॉटेल, मिठाई, आईस्क्रीम पार्लर बंद झाल्याने दुधाचा 40 टक्के खप कमी झाला आहे. त्यातून दूध अतिरिक्त होऊन भाव पडले आहेत. यात शेतकऱ्यांचा काहीच दोष नाही. अशा स्थितीत सरकारने पुढे येऊन अतिरिक्त दुधाची तयार झालेल्या भुकटीला अनुदान देऊन ती परदेशी घालवली पाहिजे.

दूध दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; शेतकरी रस्त्यावर

सातारा : दुधाला लिटरमागे 15 रुपये तोटा सहन करून कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्यापेक्षा कोरोनाच्या महामारीत एकदा काय तो निर्णय लागू देत, या त्यागाने शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. राज्य सरकारने लिटरला पाच रुपये अनुदान व केंद्र सरकारने दूध पावडर निर्यातीला अनुदान द्यावे, अन्यथा दोन्ही सरकारला आंदोलनाच्या माध्यमातून गुडघे टेकायला लावू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. 

राज्यातील दूध पट्ट्यात जाऊन जनावरांसह मोर्चा काढून श्री. शेट्टी हे तेथील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहेत. आज सोमवारी ते साता-यात आले होते. या वेळी आंदोलनापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेट्टी म्हणाले, आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भावना आम्ही सरकारपर्यंत पोचवत आहोत. लॉकडाउन, संचारबंदी आम्हाला माहिती असूनही आम्ही सविनय कायदेभंगाच्या नियमानुसार आंदोलन करतोय. शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग कशासाठी पाळायचे? दुधाला लिटरमागे 15 रुपये तोटा सहन करून कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्यापेक्षा कोरोनाच्या महामारीत एकदा काय तो निर्णय लागू देत, या त्यागाने शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

पोलिसांनी सौजन्य दाखवले तर कसा होतो कायापालट, वाचा सविस्तर 

केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउन जाहीर केल्यामुळे हॉटेल, मिठाई, आईस्क्रीम पार्लर बंद झाल्याने दुधाचा 40 टक्के खप कमी झाला आहे. त्यातून दूध अतिरिक्त होऊन भाव पडले आहेत. यात शेतकऱ्यांचा काहीच दोष नाही. अशा स्थितीत सरकारने पुढे येऊन अतिरिक्त दुधाची तयार झालेल्या भुकटीला अनुदान देऊन ती परदेशी घालवली पाहिजे.  दूध दरप्रकरणी राज्य सरकारला अपयश येत आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, दूध दराबाबत दोन्हीही सरकारे अपयशी ठरली आहेत. केवळ राज्य सरकारने उपाययोजना करून शेतकऱ्यांचा प्रश्न संपणार नाही. केंद्र सरकारने पुढे येऊन दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन देणे तसेच जीएसटीही मागे घेणे आवश्‍यक आहे. तोपर्यंत आमच्या दुधाचा खप वाढणार नाही. 

मुंबई बाजार समितीच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादीसह कॉंग्रेसची फिल्डिंग

याप्रकरणी केंद्रापासून राज्याच्या सर्व प्रमुख मंत्र्यांशी पत्रव्यवहार तसेच दूरध्वनी संपर्क करूनही काहीच निर्णय झालेला नाही. तुम्ही कशा प्रकारे सरकारला गुडघे टेकायला लावणार, या प्रश्‍नावर शेट्टी म्हणाले, दूध आमच्या हातात आहे. पोरेबाळे तुमच्या घरात आहेत. त्यामुळे दूध द्यायचे की नाही, ते आम्ही ठरवणार असल्याने दोन्ही सरकारला आम्ही गुडघे टेकायला लावू, असा इशारा त्यांनी दिला.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top