महापालिका नसतानाही साता-यात वीज कंपनीची लुट सुरु; 'स्वाभिमानी' आक्रमक

प्रशांत घाडगे
Wednesday, 28 October 2020

लॉकडाउनच्या काळातील घरगुती, व्यावसायिक व शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीजबिल माफ करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले होते. याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही.

सातारा : लॉकडाउनच्या काळातील घरगुती, व्यावसायिक व शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नुकतेच वीज वितरण कंपनीसमोर आंदोलन केले.
 
याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, संजय जाधव, हणमंत जाधव, ऍड. विजय चव्हाण, महादेव डोंगरे, हेमंत खरात आदी उपस्थित होते.

श्री. शेळके म्हणाले, ""लॉकडाउनच्या काळात ग्राहकांना वीजबिलाचा स्थिर आकार देण्यात आला नव्हता; परंतु आता एकत्रित चालू बिलामध्ये समायोजन नावाखाली स्थिर आकार देत ग्राहकांची लूट केले जात आहे. गेली अनेक वर्ष शेतीपंपाच्या बाबतीत रीडिंग तपासणीसाठी कोणतीही यंत्रणा राबत नसून अंदाजे रीडिंग ठरवून मोठ्या रकमेची बिले शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत, तसेच लॉकडाउनच्या अगोदर ग्राहकांचा स्थिर आकार 90 रुपयांप्रमाणे वसूल केला जात होता. त्यानंतर शंभर रुपये करण्यात आला; परंतु महापालिका क्षेत्रात बिलाच्या मागे प्रती ग्राहक दहा रुपये वाढ लिहिली आहे; परंतु सातारा महापालिका नसतानाही ग्राहकांकडून जादा आकाराने वसुली केली जात आहे.''

औंधच्या राणीला पुणेरी भामट्यांचा गंडा  

अन्यथा 440 व्होल्टचा करंट 

लॉकडाउनच्या काळातील घरगुती, व्यावसायिक व शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीजबिल माफ करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले होते. याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. आता मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास संघटना व जनता वीज वितरण कंपनीला 440 व्होल्टचा करंट दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimani Shetkari Sanghatana Agitation On Mahavitaran Office Satara News