Lockdown नंतर महाबळेश्‍वरला फिरायला जाताय, थांबा! वाचा 'हा' महत्वपूर्ण निर्णय

महाराष्ट्राचे नंदनवन व प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ देशात प्रसिद्ध आहे.
Mahabaleshwar
Mahabaleshwaresakal

महाबळेश्वर (सातारा) : महाबळेश्वर येथे पर्यटकांना लागू असलेला प्रवेश कर, प्रदूषण कर व नौकाविहाराच्या दरात वाढ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. लॉकडाउननंतर येणाऱ्या पर्यटकांना वाढलेला प्रवेश कर देऊनच शहरात यावे लागणार आहे. या दरवाढीमुळे पालिकेच्या तिजोरीत वर्षाला साधारण दीड कोटीची भर पडणार आहे.

पर्यटकांचे माहेरघर महाराष्ट्राचे नंदनवन व प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ देशात प्रसिद्ध आहे. येथील अनोखे नयनरम्य विलोभनीय असे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी देशभरातून दर वर्षी येथे साधारण 20 लाख पर्यटक भेट देतात. महाबळेश्वरची लोकसंख्या तशी कमी आहे; परंतु हंगामात पर्यटकांची मोठी गर्दी होते. या गर्दीमुळे नागरिकांना प्राथमिक सुविधा पुरविताना पालिकेवर अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे येथे सहलीसाठी आलेल्या पर्यटकांकडून पालिका प्रवेशकर गोळा करते. पूर्वी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने पर्यटक येत असत; परंतु आता पर्यटक आपल्या वाहनानेच येणे पसंत करतात. मोठ्या संख्येने वाहने आल्याने शहरातील प्रदूषणात वाढ होतेच; परंतु वाहतुकीची कोंडीही कायम दिसते. वाहतुकीची कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पालिकेला वाहनतळाची सोय करावी लागते. पालिका आता पर्यटकांच्या वाहनांना प्रदूषण कर आकारते.

येथे आलेल्या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी पालिकेने वेण्णालेक येथे नौकाविहाराची सोय केली आहे. या ठिकाणी दोन प्रकारच्या बोटी असून, या दोन्ही प्रकारच्या बोटींचे दर वेगवेगळे आहेत. प्रवेश कर, प्रदूषण कर व नौकाविहार ही पालिकेच्या उत्पन्नाची प्रमुख साधणे आहेत. त्यापासून पालिकेला वर्षाला साधारण सात कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते; परंतु आता पालिकेने प्रवेश कर, प्रदूषण कर व नौकाविहार यांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एक एप्रिलपासून दरवाढ अंमलात आणण्यात आली आहे. महाबळेश्वरच्या सहलीसाठी आलेल्या पर्यटकांना केवळ पालिकेलाच कर द्यावा लागतो, असे नाही तर येथील वन विभागाच्या वतीनेही पर्यटकांकडून प्रवेशकर जमा केला जातो, तसेच क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतही पर्यटकांकडून प्रतिमाणसी कर गोळा करते.

पालिकेने केलेली नवीन दरवाढ...

पूर्वी प्रत्येकी 20 रुपये प्रवेशकर वसूल केला जात होता. आता त्यामध्ये पाच रुपयांची वाढ करून प्रवेशकर प्रती माणसी 25 रुपये करण्यात आला आहे. लहान वाहनांना पूर्वी 30 रुपये, तर जड वाहनांना 50 रुपये प्रदूषण कर आकारला जात होता. आता त्यामध्ये वाढ करत लहान वाहनांना 30 ऐवजी 50 रुपये, तर जड वाहनांना 50 ऐवजी 100 रुपये आकारले जात आहेत. वेण्णालेक येथील नौकाविहाराच्या दरातही साधारण प्रतितास 50 ते 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे पालिकेच्या उत्पन्नात चांगलीच घसघशीत वाढ होणार आहे. पालिकेला दर वर्षी या दरवाढीमुळे एक ते दीड कोटी रुपयांचे जादा उत्पन्न मिळेल.

Edited By : Balkrishna Madhale

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com