Good News : कऱ्हाडला मिळणार 300 नवीन बेड; कोरोनाबाधितांना मोठा दिलासा

कोरोनाबाधितांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. पहिल्यापेक्षा जादा वेगाने याचा प्रसार होत आहे.
Hospital
Hospitalesakal

कऱ्हाड (सातारा) : कोरोनाबाधितांची संख्या कऱ्हाड, मलकापूर, सैदापूर, कोयना वसाहतीसह तालुक्‍यातील गावागावांत मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे रुग्ण हॉस्पिटलला आल्यानंतर त्यांना तत्काळ बेड उपलब्ध व्हावे, या अनुषंगाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू करून कृष्णासह अन्य हॉस्पिटलमध्ये नवीन 300 पर्यंत बेड वाढवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या निर्णयामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

कोरोनाबाधितांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. पहिल्यापेक्षा जादा वेगाने याचा प्रसार होत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या दुपटीने वाढत असल्याचे शहरासह तालुक्‍यात दिसत आहे. त्यामुळे बेडची संख्या वाढवण्यासह अन्य उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. प्रांताधिकारी दिघे, पोलिस उपअधक्षिक डॉ. रणजित पाटील, तहसीलदार वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, मुख्याधिकारी रमाकांत डाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख आदींना उपाययोजना संदर्भात सूचना केल्या.

त्यानुसार प्रांताधिकारी दिघे, तहसीलदार वाकडे यांनी कृष्णा, सह्याद्री, एरम हॉस्पिटल, राजश्री हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल, कऱ्हाड हॉस्पिटल, बालाजी हॉस्पिटलमध्ये बेड वाढवण्यासंदर्भात कार्यवाही केली आहे. उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत. त्याचबरोबर सह्याद्री कारखान्याचे कोविड सेंटर सुरू केले असून पार्लेतीलही सेंटर सुरू होणार आहे. त्यामुळे नवीन 300 बेड उलब्ध होणार आहेत. कऱ्हाडमध्ये रुग्ण वाढत आहेत. त्यासाठी सुरू होणाऱ्या कोरोना सेंटमध्ये एमडी डॉक्‍टरांची आवश्‍यकता आहे. शहरात प्रॅक्‍टीस करणाऱ्या एमडी डॉक्‍टरांनी काही तास कोरोना सेंटरमध्ये सेवा दिल्यास तेथील रुग्णांनाही त्याची मदत होईल. त्यासाठी डॉक्‍टरांनी सामाजिक बांधिलकीतून पुढे यावे, असे आवाहन प्रांताधिकारी दिघे यांनी केले आहे.

कऱ्हाडातील ऍक्‍टिव्ह रुग्ण...

  • कऱ्हाड शहर- 147, मलकापूर- 144, सैदापूर- 35, काले- 27, गोळेश्वर- 21, कार्वे- 21, कोयना वसाहत- 21, बनवडी- 20, उंब्रज- 12, हजारमाची- 17.

कऱ्हाडमध्ये बेड वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सूचना केली आहे. त्यानुसार प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली बेड वाढवणार आहे. त्याचा रुग्णांना फायदा होईल.

-अमरदीप वाकडे, तहसीलदार, कऱ्हाड

Edited By : Balkrishna Madhale

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com