गोळीबार करणाऱ्या तिघांची नावे निष्पन्न

साताऱ्यातील घटना; तपासासाठी पथके रवाना
shooters
shooters

सातारा - येथील नटराज मंदिरासमोर काल (ता. २) गोळ्या झाडून झालेल्या खुनाच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला उकल झाली असून तीन संशयित निष्पन्न झाले आहेत. पोलिस पथक त्यांच्या मागावर असून लवकरच त्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.

वाईमधील सिद्धनाथवाडीतील अर्जुन यादव ऊर्फ राणा औंधकर यांचा काल नटराज मंदिरासमोर गोळ्या घालून अनोळखी व्यक्तींनी खून केला. २०२० मध्‍ये वाईमध्‍ये झालेल्या गोळीबारात तो आरोपी होता. त्यानंतर त्याने वाईतून सातारा, फलटण व बारामती परिसरात आपला मुक्काम हलवला. न्‍यायालयीन तसेच पोलिस ठाण्‍यातील कामासाठी सिद्धनाथवाडीतील चुलत्‍यांकडे तो जायचा. काल दुपारी अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलिस दल खडबडून जागे झाले.

त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ हे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्‍थळी गेले. घटनास्‍थळाची पाहणी करत इतरांकडे चौकशी केली. त्यामध्ये अर्जुन हा दुचाकी लावून मंदिरात गेला होता. दोन युवक त्याच्या पाठोपाठ मंदिरात गेले. तसेच तो बाहेर पडल्यावर त्यांनी त्याच्यावर गोळीबार केल्याचे समोर आले.

एवढ्या माहितीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास सुरू केला. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्याचबरोबर या कालावधीत मोबाईल लोकेशनच्या आधारे तांत्रिक माहिती जमा केली. तसेच अर्जुनशी संबंधित व्यक्तींची माहिती गोळा केली.

त्याचा कोणाकोणाशी वाद झाला होता, याचीही माहिती घेण्यात आली. खबऱ्यांचे नेटवर्क ॲक्‍टिव्ह करत संशयितांच्या नावांची चाचपणी केली. मिळालेल्या सर्व माहितीचे एकत्रिकरण करत त्याआधारे पोलिसांनी अर्जुनच्या खुनातील संशयितांना निष्पन्न केले आहे. त्यांच्या शोधासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच संशयित जेरबंद होण्याची शक्यता आहे. संशयितांना अटक केल्यानंतर खुनाचे नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com